(संगमेश्वर / प्रतिनिधी)
श्रीराम फायनान्सकडून घेतलेले ५० लाख रुपयांचे कर्ज थकविल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने फायनान्स कंपनीने ताब्यात घेतलेल्या मालमत्तेचे सील आणि कुलूप तोडून पुन्हा घराचा ताबा घेतल्याचा धक्कादायक प्रकार देवरुख येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी सागर रघुनाथ फटकरे आणि त्यांच्या पत्नी माया फटकरे यांच्याविरोधात देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी हा गुन्हा दाखल झाला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी श्रीराम फायनान्स लिमिटेडच्या रत्नागिरी शाखेकडून ५० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जासाठी देवरुख येथील सर्व्हे क्रमांक १६३, हिस्सा क्रमांक ०२अ, ३ए/७ मधील नगरपंचायत घर क्रमांक २/१२५अ, एकूण ५६४ चौरस मीटर क्षेत्रफळाची आणि १३८.५० चौरस मीटर बांधकाम क्षेत्र असलेली मालमत्ता तारण म्हणून ठेवली होती. मात्र, कर्जाची परतफेड न केल्यामुळे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, रत्नागिरी यांच्या ७ मार्च २०२६ रोजीच्या आदेशानुसार संबंधित मालमत्तेचा ताबा श्रीराम फायनान्सच्या रत्नागिरी शाखेला देण्यात आला होता. त्यानुसार कंपनीने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मालमत्ता ताब्यात घेतली होती.
दरम्यान, २६ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास आरोपींनी मालमत्तेच्या दरवाजाला आणि कुलपाला लावलेले सील तोडून नुकसान केल्याचा आरोप आहे. त्यानंतर कोणताही अधिकृत अधिकार नसताना संबंधित मालमत्तेत प्रवेश करून घराचा बेकायदेशीररीत्या ताबा घेतल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तसेच लोकसेवकाने रीतसर जारी केलेल्या आदेशाचा भंग करून आरोपी क्रमांक एक आणि दोन हे त्या घरात राहात असल्याचे निदर्शनास आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
याप्रकरणी श्रीराम फायनान्स लिमिटेडच्या रत्नागिरी शाखेचे मुखत्यारपत्रधारक सागर गणपत कांबळे (वय ४०, रा. फणसोप, रत्नागिरी) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार सागर रघुनाथ फटकरे आणि माया सागर फटकरे (दोघेही रा. देवरुख, ता. संगमेश्वर) यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३२९(४), ३२४, ३(५) तसेच सरफेसी कायद्याच्या कलम २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशाने ताब्यात घेतलेल्या मालमत्तेचे सील तोडून पुन्हा ताबा मिळविण्याच्या या प्रकारामुळे देवरुख परिसरात चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास देवरुख पोलीस करीत आहेत.


