(कुडाळ / रत्नागिरी)
आर्थिक लाभ आणि जुगाराच्या उद्देशाने मुक्या जनावरांना झुंजीसाठी मैदानात उतरविण्याचा धक्कादायक प्रकार कुडाळ तालुक्यातील पिंगुळी-गोंधळपूर मुस्लिमवाडी येथे उघडकीस आला. मोकळ्या मैदानावर छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या बैलांच्या बेकायदा झुंजीवर कुडाळ पोलिसांनी शुक्रवारी (६ नोव्हेंबर) पहाटे ६.३० वाजण्याच्या सुमारास धाड टाकली. पोलिसांची चाहूल लागताच झुंज पाहण्यासाठी जमलेल्या गर्दीची एकच पळापळ झाली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत झुंज थांबवली आणि सुमारे एक लाख रुपये किमतीचे दोन बैल ताब्यात घेतले. या प्रकरणी आयोजकासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बैलांच्या झुंजीच्या माध्यमातून पैशांची देवाणघेवाण आणि जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस फौजदार कोळेकर यांनी स्थानिक पोलीस पाटील शंकर सातार्डेकर यांच्या उपस्थितीत घटनास्थळी चौकशी केली. प्राथमिक तपासात पिंगुळी येथील गुलाब अब्दुल लतीफ शेख याने या झुंजीचे आयोजन केल्याचे समोर आले. या कारवाईत ताब्यात घेतलेल्या दोन बैलांपैकी एक पांढऱ्या रंगाचा असून त्याची किंमत ५० हजार रुपये आहे. हा बैल रत्नागिरी जिल्ह्यातील टेंबे खाडेवाडी येथील सुभाष मनोहर खाडे (वय ४७) यांच्या मालकीचा आहे. दुसरा करड्या रंगाचा बैल असून त्याचीही किंमत ५० हजार रुपये आहे. तो नेरूर-दुर्गवाड येथील मुन्ना मुजावर यांच्या मालकीचा असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या दोन्ही बैलांना रत्नागिरीतील टेम्पोचालक सर्वेश सुरेश भातडे आणि अन्य एका चालकाच्या संगनमताने बोलेरो मॅक्स व पिकअप टेम्पोमधून विनापरवाना झुंजीच्या मैदानावर आणण्यात आले होते. या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली दोन्ही वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत.
बैलांना झुंजीसाठी प्रवृत्त करून त्यांना गंभीर दुखापत होण्याचा धोका निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. या प्रकरणी प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११(१)(m), ११(१)(n), महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ चे कलम १२(अ) आणि भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३(५) अन्वये एकूण पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, कारवाईत ताब्यात घेतलेल्या दोन्ही बैलांना सुरक्षिततेच्या दृष्टीने कुडाळ पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवण्यात आले आहे. या बेकायदा झुंजीचे आयोजन, आर्थिक व्यवहार आणि संबंधितांची भूमिका याबाबत कुडाळ पोलीस पुढील तपास करीत आहेत.


