(चिपळूण /रत्नागिरी)
पोलिसांचा गणवेश परिधान करून आपण नाशिकमधील पंचवटी पोलीस ठाण्यातून बोलत असल्याचे भासवायचे, व्हॉट्सॲप कॉल आणि व्हिडीओ कॉलद्वारे समोरच्या व्यक्तीवर दबाव निर्माण करायचा आणि मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवून लाखो रुपये उकळायचे, अशी सायबर फसवणुकीची धक्कादायक घटना चिपळूण तालुक्यातील बामणोली येथे उघडकीस आली आहे. या प्रकारात ६५ वर्षीय डॉक्टर विलास महादेव ओक यांना तब्बल २३ लाख ९५ हजार रुपयांचा आर्थिक गंडा घालण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी विलास महादेव ओक हे व्यवसायाने डॉक्टर असून बामणोली, डिंगणकरवाडी येथे वास्तव्यास आहेत. ३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजल्यापासून १९ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंतच्या कालावधीत आरोपी संजय पिसे (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) याने त्यांच्याशी व्हॉट्सॲप कॉल तसेच व्हिडीओ कॉलद्वारे संपर्क साधला. यावेळी आरोपीने पोलिसांचा गणवेश परिधान करून आपण नाशिक येथील पंचवटी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी असल्याचे भासवले. फिर्यादींच्या नावावरील एअरटेल सिमकार्डविरोधात २० जणांच्या तक्रारी दाखल असल्याचे सांगितले. तसेच त्यांच्या नावावरील बँक खात्याचा वापर मनी लाँड्रिंगसारख्या गंभीर आर्थिक गैरव्यवहारासाठी झाल्याचा बनाव रचला. या कथित प्रकरणामुळे फिर्यादींना कायदेशीर कारवाईची भीती दाखवून आरोपीने त्यांच्याकडून ऑनलाइन पद्धतीने एकूण २३ लाख ९५ हजार रुपये उकळले.
आपली पोलीस अधिकारी म्हणून ओळख पटवून देण्यासाठी गणवेशाचा वापर आणि व्हिडीओ कॉलचा आधार घेत आरोपीने फिर्यादींचा विश्वास संपादन केला. मात्र, पोलिसांच्या नावाचा गैरवापर करून अशा प्रकारे आर्थिक फसवणूक केल्याचे समोर आल्यानंतर या प्रकरणाचे गांभीर्य अधोरेखित झाले आहे. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात आरोपी संजय पिसे याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम ३१८(२), ३१९(२), २०४, माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६(ड) तसेच भारतीय दंड विधानातील कलम ४१७, ४१९ आणि १७० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


