( मुंबई )
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पुन्हा एकदा अंतर्गत वाद उफाळून आला आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या निवडीवर पक्षातीलच ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी गंभीर आक्षेप घेत कायदेशीर नोटीस बजावली आहे. त्यांनी 26 फेब्रुवारी 2026 रोजी झालेली राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड अवैध असल्याचा दावा करत ती रद्द करून नव्याने निवडणूक घेण्याची मागणी केली आहे. या नोटिशीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या राजकीय चर्चांना उधाण आले असून पक्षातील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत.
सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल आणि पक्ष सचिवांना नोटीस
सच्चिदानंद सिंह यांनी वकिलामार्फत पाठविलेली नोटीस राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार, राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि राष्ट्रीय सचिव ब्रिजमोहन श्रीवास्तव यांना 9 जुलै रोजी पाठवली आहे. नोटिशीत 26 फेब्रुवारी 2026 रोजी झालेली राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पक्षाच्या संविधानाशी विसंगत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे ही निवड रद्द करून स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणूक अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली नव्याने निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच, नवीन निवडणूक होईपर्यंत राष्ट्रीय अध्यक्ष आणि नव्याने जाहीर करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांची यादीही अमान्य मानण्यात यावी, अशी मागणी नोटिशीत करण्यात आली आहे.
सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष कशा झाल्या?
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर 2023 मध्ये अजित पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली होती. मात्र, 28 जानेवारी 2026 रोजी विमान अपघातात त्यांचे निधन झाल्यानंतर पक्षाच्या नेतृत्वाचा प्रश्न निर्माण झाला. यानंतर 26 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत प्रफुल्ल पटेल यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, ज्याला उपस्थित सदस्यांनी मंजुरी दिली. त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली.
सच्चिदानंद सिंह यांचे नेमके आक्षेप काय?
नोटिशीत सच्चिदानंद सिंह यांनी निवड प्रक्रियेबाबत काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत.
- 28 जानेवारी 2026 रोजी अजित पवार यांच्या निधनानंतर 17 फेब्रुवारी 2026 रोजी निवडणूक आयोगाकडे सुधारित पक्ष संविधान सादर करण्यात आले.
- त्या संविधानानुसार राष्ट्रीय अध्यक्षाची निवड होईपर्यंत कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्याकडे राष्ट्रीय अध्यक्षांचे सर्व अधिकार असतील, असे नमूद करण्यात आले होते.
- अशा परिस्थितीत राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावण्याचा अधिकार प्रफुल्ल पटेल यांच्याकडे असताना ती बैठक राष्ट्रीय सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी कोणत्या अधिकारात बोलावली?, असा सवाल सिंह यांनी उपस्थित केला आहे.
- तसेच 18 फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आलेल्या पत्राला तत्कालीन राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यांची आवश्यक मंजुरी नव्हती, असाही आरोप करण्यात आला आहे.
‘ही नोटीस केवळ प्रसिद्धीसाठी’ : राष्ट्रवादीचे स्पष्टीकरण
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस सूरज चव्हाण यांनी या सर्व आरोपांचे खंडन केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदावरील निवड पूर्णपणे कायदेशीर असून पक्षाच्या संविधानानुसारच करण्यात आली आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीने अध्यक्षपदाची निवड केल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षांना इतर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे अधिकार असतात. त्यानुसार प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आणि सुनील तटकरे यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. सूरज चव्हाण यांनी नोटीस पाठविण्यामागे केवळ प्रसिद्धी मिळविण्याचा उद्देश असल्याचा आरोप करत, पक्ष लवकरच यावर सविस्तर भूमिका मांडेल, असेही स्पष्ट केले.
कोण आहेत सच्चिदानंद सिंह?
- राष्ट्रवादी काँग्रेसचे झारखंड प्रदेशाध्यक्ष.
- गेल्या सुमारे 15 वर्षांपासून पक्षाशी संबंधित.
- डिसेंबर 2023 मध्ये कर्जत येथील अधिवेशनात राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती.
- 26 फेब्रुवारी 2026 रोजी नव्याने जाहीर झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीत त्यांचा समावेश करण्यात आला नव्हता.
या नोटिशीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा चर्चेत आले असून, पक्ष नेतृत्व या प्रकरणावर पुढे काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

