(छत्रपती संभाजीनगर)
शहराजवळील खवड्या डोंगरावरून एका १६ वर्षीय तरुणाने उडी मारून आत्महत्या केली असून, या घटनेने परिसर हादरला आहे. आईने मोबाईल दिला नाही या कारणावरून या मुलाने आयुष्य संपवले. या घटनेतून मोबाईलचा किती अतिरेक वाढला आहे, हे स्पष्ट दिसून येते. अथर्व गोपाल तायडे असे या मुलाचे नाव असून, तो आपल्या आई-वडिलांसोबत संभाजीनगरच्या वाळूज परिसरात राहत होता. तो सध्या पोलीस भरतीसाठी तयारी करत होता. काही दिवसांपूर्वी त्याने आई-वडिलांकडे मोबाईलची मागणी केली होती. मात्र आईने सध्या मोबाईल नको असे सांगत विरोध केला. यामुळे अथर्व रागावला आणि त्याच रागातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.
काही दिवसांपूर्वी त्याने आई-वडिलांकडे मोबाइलची मागणी केली होती. मात्र, आईने “सध्या मोबाईल घेऊ नको” असे स्पष्ट सांगितल्याने तो नाराज झाला होता. आईने मोबाईल न दिल्याने अथर्व थेट खवड्या डोंगरावर गेला आणि उंचावरून उडी मारली. यावेळी त्याची आईसुद्धा त्याचे मागे निघाली. परंतु, आई तिथे पोहोचताच अथर्वने थेट तिसगाव शिवारातील खवड्या डोंगरावर जाऊन सुमारे 100 फूट उंचीवरून उडी घेतली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अथर्वचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, तायडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आईचा आक्रोश ऐकून उपस्थितांचे हृदय पिळवटून निघाले.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अशाच कारणांमुळे आत्महत्यांच्या घटना वारंवार समोर येत असल्याने पालकांसमोर गंभीर आव्हान निर्माण झाले आहे. अगदी लहान मुलं देखील मोबाईलसारख्या कारणांवरून टोकाचे निर्णय घेत असल्याने परिस्थिती भयंकर आहे. पालकांनी आपल्या मुलांना समजून घेणे, त्यांना विश्वासात घेऊन बोलणे आणि मोबाईलच्या योग्य वापराबाबत मार्गदर्शन करणे अत्यंत आवश्यक आहे.
मुलांमध्ये वाढत चाललेली अस्थिरता, निर्णय घेण्याची घाई आणि तात्कालिक राग याचे परिणाम गंभीर ठरू शकतात. पालकांनी संवाद वाढवून मुलांना वेळ द्यावा, जेणेकरून अशा घटना टाळता येतील. गेल्या काही वर्षांत मोबाईलचा क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढला असून, अल्पवयीन मुलांमध्ये हा वाढता मोह पालकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. अनेक मुलं महागडे स्मार्टफोनसाठी हट्ट धरताना दिसतात. मात्र आता मोबाईल न दिल्यामुळे आत्महत्येपर्यंत मुलं जात असल्याचं समोर आल्यानं समाजात चिंता अधिकच वाढली आहे.