(मुंबई)
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची युती आकाराला आलेली असतानाच मनसेला मोठा राजकीय धक्का बसला आहे. मुंबईतील मनसेचे माजी नगरसेवक व प्रमुख नेते संतोष धुरी हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सोमवारी रात्री उशिरा संतोष धुरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने या चर्चेला अधिक बळ मिळाले आहे. मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारामुळे संतोष धुरी यांच्या भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात आहे. धुरी यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर लवकरच त्यांचा अधिकृत भाजप प्रवेश होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्रभादेवीतील वॉर्ड क्रमांक 194 हा मनसेला मिळावा यासाठी संतोष धुरी आग्रही होते. मात्र जागावाटपात हा वॉर्ड शिवसेना ठाकरे गटाला देण्यात आला आणि तो सुनील शिंदे यांच्या भावाला सोडण्यात आल्याने धुरी नाराज झाले. नाराजीच्या भरात काही काळ त्यांनी आपला मोबाईल फोनही बंद ठेवला होता. नंतर ते मनसेच्या मेळाव्याला उपस्थित राहिले, मात्र त्यांची अस्वस्थता आणि नाराजी कायम होती.
दरम्यान, ऐन निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना UBTलाही धक्का बसला असून माजी महापौर शुभा राऊळ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. निवडणुकीसाठी नव्हे तर समाजसेवेच्या उद्देशाने भाजपमध्ये प्रवेश केल्याचे राऊळ यांनी स्पष्ट केले आहे.
ठाकरे बंधूंची युती झाली असली तरी काही प्रभागांमध्ये बंडखोरी उफाळून आली आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी शिवसेना UBT आणि मनसेचे नेते प्रयत्नशील आहेत. बंडखोरी रोखण्यासाठी दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते थेट मैदानात उतरणार आहेत. मात्र या प्रयत्नांदरम्यान काही नेते पक्ष सोडत असल्याचे चित्र दिसत आहे.
संतोष धुरी हे राज ठाकरे यांच्या मनसेचे माजी नगरसेवक असून मनसेचे मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे यांच्याशी त्यांची घनिष्ठ मैत्री आहे. मनसेच्या प्रत्येक आंदोलनात धुरी सक्रिय भूमिका बजावत होते. मागील मुंबई महापालिका निवडणुकीत त्यांनी मनसेकडून निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता.
यावेळी ठाकरे बंधूंची युती होत असताना वॉर्ड क्रमांक 194 मधून संतोष धुरी निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. संदीप देशपांडे यांनीही त्यांच्या तिकीटासाठी प्रयत्न केले होते. मात्र जागा उद्धव ठाकरे गटाला मिळाल्याने धुरी आणि देशपांडे नाराज असल्याची चर्चा होती.
यानंतर संदीप देशपांडे मनसे उमेदवारांना एबी फॉर्म वाटताना दिसले, तसेच राज ठाकरे यांच्या मेळाव्यात संतोष धुरी उपस्थित होते. तरीही नाराजी कायम राहिल्याने अखेर धुरी यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. मुख्यमंत्र्यांची भेट आणि सुरू असलेल्या हालचालींमुळे लवकरच मुंबईच्या राजकारणात मोठा बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

