(रत्नागिरी / वार्ताहर)
राजापूर तालुक्यातील कळसवली ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५-२६ अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवत ५० लाख रुपयांच्या जिल्हास्तरीय अत्युत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कारावर नाव कोरले आहे. ग्रामपंचायतीने राबविलेली विकासकामे, प्रशासकीय नियोजन आणि अभियानातील विविध निकषांनुसार केलेल्या कामगिरीची शासनस्तरीय मूल्यमापनातून दखल घेण्यात आली आहे. ग्रामविकास विभागाने ६ नोव्हेंबर रोजी जाहीर केलेल्या शासन निर्णयातून या पुरस्कारासाठी कळसवली ग्रामपंचायतीची निवड निश्चित झाली.
गावातील स्वच्छता, पाणी व्यवस्थापन, वृक्षगणना, डिजिटल कामकाज आणि विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी या कामांमुळे ग्रामपंचायतीला हे यश मिळाल्याचे सांगण्यात आले. हा पुरस्कार केवळ ग्रामपंचायतीच्या कामाचा गौरव नसून गावातील प्रत्येक व्यक्तीच्या एकजुटीचा, मेहनतीचा आणि सामूहिक प्रयत्नांचा सन्मान असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे.
ग्रामीण भागातील विकासाला गती देण्याच्या उद्देशाने शासनाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविले. या उपक्रमांतर्गत ग्रामपंचायतींच्या कामगिरीचे तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्य अशा विविध स्तरांवर मूल्यमापन करण्यात आले. या प्रक्रियेत कळसवली ग्रामपंचायतीने जिल्ह्यात अव्वल स्थान मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली.
या यशात ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, सरपंच, ग्रामसेवक आणि कर्मचारी यांचे योगदान महत्त्वाचे ठरले. पंचायत समिती स्तरावरील अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, सातत्याने केलेला पाठपुरावा तसेच जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे नियोजन आणि समन्वय यांचाही या कामगिरीत मोलाचा वाटा आहे. अभियानातील निकष पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने केलेले प्रयत्न आणि ग्रामपंचायतीने राबविलेली विकासकामे यांची सांगड या यशामागे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या कामगिरीत विशेष योगदान देणाऱ्या ग्रामपंचायत अधिकारी सोनाली आराख यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे. त्यांनी केलेले नियोजन, मेहनत आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा कौतुकास्पद असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
५० लाख रुपयांचा प्रथम पुरस्कार मिळाल्यामुळे कळसवली ग्रामपंचायतीच्या आगामी विकासकामांना आर्थिक बळ मिळणार आहे. तसेच ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात यापुढेही अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी या पुरस्कारातून नवी प्रेरणा मिळणार आहे.


