(खेड/ रत्नागिरी)
माहेरी जाण्यासाठी एसटी बसमध्ये बसलेली २३ वर्षीय विवाहित महिला नियोजित ठिकाणी पोहोचलीच नसल्याचा धक्कादायक प्रकार खेड तालुक्यातील लवेल येथे उघडकीस आला आहे. सौ. प्रणाली आदर्श गमरे (वय २३, रा. लवेल, बौद्धवाडी, ता. खेड) असे बेपत्ता महिलेचे नाव आहे. तिचे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याचा संशय व्यक्त करीत पती आदर्श संदीप गमरे (वय २४) यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास प्रणाली गमरे या लवेल पेट्रोलपंप येथील एसटी बसथांब्यावरून बसमध्ये बसून एकट्याच माहेरी जाण्यासाठी रवाना झाल्या होत्या. त्यांचे माहेर महाड तालुक्यातील गंधारपाले, जिल्हा रायगड येथे आहे. मात्र, त्या माहेरी पोहोचल्या नसल्याचे समोर आले. पत्नी नियोजित ठिकाणी पोहोचली नसल्याने पती आदर्श गमरे यांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. नातेवाईक आणि परिचितांकडे चौकशी करूनही तिचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. अखेर कोणीतरी अज्ञात व्यक्तीने गैरकायदेशीररीत्या तिला डांबून ठेवण्याच्या उद्देशाने तिचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त करीत त्यांनी पोलिसांत धाव घेतली.
या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम १४०(३) अन्वये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेपत्ता प्रणाली गमरे यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर असून, या प्रकरणाचा पुढील तपास खेड पोलीस करीत आहेत.


