(खेड/ रत्नागिरी)
घर बंद असल्याची संधी साधत अज्ञात व्यक्तीने घराच्या सुरक्षेला भेदून आत प्रवेश केला आणि लोखंडी कपाट व लॉकर उघडून त्यातील पाच हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना खेड तालुक्यातील बोरघर-राहाटवाडी येथे उघडकीस आली. घरातील साहित्य अस्ताव्यस्त अवस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुधीर सिताराम पवार (५०, व्यवसायाने वकील, रा. गोरेगाव पश्चिम, मुंबई; सध्या मुक्काम खेड) हे घरात नसताना हा प्रकार घडला. ११ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजल्यापासून १४ सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात व्यक्तीने त्यांच्या दुमजली घराला लावलेले सेफ्टी दरवाजाचे तसेच आतील दरवाजाचे दोन्ही लॉक कोणत्यातरी हत्याराच्या साहाय्याने उचकटल्याचा आरोप आहे. दरवाजा उघडून घरात अनधिकृत प्रवेश केल्यानंतर चोरट्याने घरातील साहित्य अस्ताव्यस्त केले. त्यानंतर लोखंडी कपाट आणि त्यातील लॉकर उघडून रोख पाच हजार रुपये घेऊन अज्ञात व्यक्तीने पोबारा केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३११/२०२६ दाखल करण्यात आला आहे. अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम ३३१ (३), ३३१ (४) आणि ३०५ (अ) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. बंद घराची कुलपे हत्याराने उचकटून घरात प्रवेश केल्याने या घटनेत केवळ चोरीच नव्हे, तर घराच्या सुरक्षेचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे. अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.


