(खेड)
कोकणातील सर्वात मोठ्या औद्योगिक पट्ट्यांपैकी एक असलेल्या लोटे औद्योगिक वसाहत येथे आज दुपारी भीषण स्फोटाची घटना घडली. DKIC (Dr. Khan Industrial Consultants) या केमिकल कंपनीत झालेल्या या स्फोटात सुमारे सहा ते सात कामगार गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
दुपारच्या सुमारास अचानक झालेल्या या स्फोटामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला. स्फोट इतका तीव्र होता की कंपनी परिसरात मोठा आवाज झाला आणि आसपासच्या भागात काही काळ भीती व घबराटीचे वातावरण निर्माण झाले. कामगार आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने बाहेर धाव घेतल्याने काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.
स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीमध्ये सलग दोन स्फोट झाल्याचे सांगितले जात आहे. या स्फोटात काही कामगार गंभीररित्या भाजले असून त्यांना तातडीने उपचारासाठी जवळील रुग्णालयात हलविण्यात आले. जखमी कामगारांना प्रथम परशुराम हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. त्यापैकी तीन कामगारांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी ऐरोली बर्न हॉस्पिटल येथे हलविण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान, पोलीस प्रशासन आणि औद्योगिक वसाहतीतील आपत्कालीन पथके घटनास्थळी दाखल झाली. आग किंवा इतर धोका टाळण्यासाठी परिसर तात्काळ सुरक्षित करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली आहे.
जखमींची नावे
१) समीर शेख, लोटे
२) अरमान शहा, लोटे
३) रघुनाथ खंडू खामकर, मुरडे
४) शिवानंद बाबुराव खोंडे, घाणेखुंट
५) परवेज शेख, लोटे
६) इस्तीयाज शेख, लोटे
दरम्यान, स्फोट नेमका कशामुळे झाला याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नसून संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. या घटनेमुळे औद्योगिक वसाहतीतील सुरक्षा व्यवस्थेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

