(रत्नागिरी / प्रतिनिधी)
घराजवळील बांधकामाच्या ठिकाणी झाडू मारत असलेल्या ४८ वर्षीय व्यक्तीवर चाकूने हल्ला केल्याची घटना शहरातील राजिवडा बांध परिसरात घडली. ईरफान अमिरुद्दीन सुवर्णदुर्गकर (वय ४३, रा. राजिवडा बांध, रत्नागिरी) याने कोणतेही कारण नसताना चाकूने वार केल्याचा आरोप जखमी अब्दुल रशिद मजिद वस्ता (वय ४८, रा. घर नं. ११२, राजिवडा बांध) यांनी केला आहे. या हल्ल्यात त्यांच्या डाव्या खांद्यावर आणि हनुवटीच्या डाव्या बाजूला दुखापत झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, ३ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घर क्रमांक ११२ जवळ ही घटना घडली. अब्दुल रशिद मजिद वस्ता हे घराजवळील बांधकामाच्या ठिकाणी झाडू मारत असताना ईरफान सुवर्णदुर्गकर याने अचानक हातातील चाकूने त्यांच्या डाव्या खांद्यावर तसेच हनुवटीच्या डाव्या बाजूला वार केले. या हल्ल्यात ते जखमी झाले.
या प्रकरणी जखमी अब्दुल रशिद मजिद वस्ता यांच्या तक्रारीवरून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात ईरफान अमिरुद्दीन सुवर्णदुर्गकर याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ११८(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस करीत आहेत.


