(रत्नागिरी / वार्ताहर)
महाराष्ट्र शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या चौथ्या यादीत रत्नागिरी जिल्ह्यातील ७८५ पात्र शेतकऱ्यांचा समावेश झाला आहे. या शेतकऱ्यांची ४ कोटी ४९ लाख रुपयांची कर्जमुक्ती मंजूर करण्यात आली असून, संबंधित रक्कम थेट त्यांच्या कर्जखात्यात जमा केली जात आहे. जिल्हा उपनिबंधक राम कुलकर्णी यांनी ही माहिती दिली.
कोकण विभागातील पाच जिल्ह्यांमधील एकूण ६,९३९ शेतकऱ्यांना या योजनेतून ४३.७७ कोटी रुपयांचा लाभ मिळाला आहे. यामध्ये रायगड जिल्ह्यातील १,५९६ शेतकऱ्यांना १२ कोटी रुपये, ठाणे जिल्ह्यातील २,४२९ शेतकऱ्यांना १४.७४ कोटी रुपये, पालघरमधील १,४९० शेतकऱ्यांना ८.४४ कोटी रुपये आणि सिंधुदुर्गमधील ६३९ शेतकऱ्यांना ४.१० कोटी रुपये मिळाले आहेत. रत्नागिरीतील ७८५ शेतकऱ्यांना ४.४९ कोटी रुपयांचा लाभ मंजूर झाला आहे.
शासनाने २ जून २०२६ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार, १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वितरित करण्यात आलेली आणि ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेली पीक कर्जे या योजनेसाठी पात्र ठरवण्यात आली आहेत. या अंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्ती दिली जात आहे.
योजनेच्या चौथ्या टप्प्यात राज्यभरातील आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या ४.८७ लाख शेतकऱ्यांच्या खात्यांवर ४ हजार ७६४ कोटी ७७ लाख रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे थकीत पीक कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळत आहे.
महाआयटीमार्फत राबविण्यात येणाऱ्या या योजनेसाठी बँकांनी संगणकीय प्रणालीवर आतापर्यंत ३१.१७ लाख खात्यांची माहिती नोंदवली आहे. विविध याद्यांद्वारे आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या राज्यातील एकूण २०.७२ लाख पात्र शेतकऱ्यांना आतापर्यंत १८ हजार ४० कोटी रुपयांची कर्जमुक्ती अदा करण्यात आली आहे. चौथ्या यादीतील निधी वितरणामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील आणखी ७८५ शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळाला आहे.


