(खेड / वार्ताहर)
सध्या सुरू असलेल्या जनगणना मोहिमेचे काम युद्धपातळीवर सुरू असून, मे महिन्याच्या कडक उन्हात प्राथमिक शिक्षक दिवस-रात्र मेहनत घेत राष्ट्रीय कर्तव्य पार पाडत आहेत. मात्र अनेक प्रगणक शिक्षकांवर अत्याधिक कामाचा ताण पडत असल्याने २०० ते ३०० पेक्षा अधिक गणनाघरे असलेल्या प्रगणकांना मदतनीस प्रगणक नियुक्त करण्यात यावा, अशी आग्रही मागणी शिक्षक समिती खेडतर्फे करण्यात आली आहे.
याबाबत शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने खेडचे तहसीलदार सुधीर सोनवणे यांची भेट घेत निवेदन सादर केले. काही प्रगणकांना तीनशेहून अधिक गणनाघरे देण्यात आल्यामुळे प्रत्यक्ष काम करताना मोठ्या अडचणी निर्माण होत असल्याचे समितीने निदर्शनास आणून दिले.
या मागणीची दखल घेत तहसीलदार सुधीर सोनवणे यांनी शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. सध्या सुरू असलेले गणनाघरांचे काम पूर्ण करून घ्यावे, तसेच ज्या प्रगणकांकडे ३०० पेक्षा अधिक गणनाघरे आहेत त्यांना पुढील टप्प्यात मदतनीस प्रगणक उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
तहसीलदार यांच्या भेटीदरम्यान शिक्षक समितीचे अध्यक्ष संतोष चव्हाण, सचिव धर्मपाल तांबे, जिल्हा प्रतिनिधी राजेश भागणे, प्रवक्ते शैलेश पराडकर तसेच बबन मोरे आणि सुनील वाघमारे उपस्थित होते.

