(खेड)
मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात मुसळधार पावसामुळे धोकादायक परिस्थिती निर्माण झाली असून, घाटातील रस्त्याला मोठमोठ्या भेगा पडल्याचे समोर आले आहे. या भेगा झाकण्यासाठी ठेकेदाराकडून तात्पुरती मलमपट्टी करण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. त्यामुळे महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून वाहनचालकांच्या सुरक्षिततेबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे.
या घटनेची माहिती मिळताच भोस्ते परिसरातील नागरिकांनी जिल्हा परिषद सदस्या रेवती पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. पाहणीदरम्यान ठेकेदाराने सिमेंटचे पाणी आणि इतर साहित्य वापरून रस्त्यावरील भेगा बुजवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. रेवती पाटील यांनी ते साहित्य बाजूला करून प्रत्यक्ष पाहणी केली असता भेगा खोलवर गेल्याचे निदर्शनास आले.
यावेळी त्यांनी ठेकेदाराला नागरिकांच्या जीवाशी खेळू नये, असा इशारा देत तात्पुरत्या उपायांऐवजी कायमस्वरूपी आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या. तसेच या गंभीर प्रकाराची माहिती तालुका प्रशासनालाही देण्यात आली असून संबंधित विभागाने तातडीने तांत्रिक पाहणी करून आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, भोस्ते घाटातील धोकादायक वळणावर भर पावसात रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. मोठ्या यंत्रसामग्रीद्वारे ड्रिलिंग सुरू असल्याने घाटाखालील गावांवर दरड कोसळण्याचा धोका वाढल्याची भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
सततच्या पावसामुळे भोस्ते घाटातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून रस्त्यावर पडलेल्या खोल भेगांमुळे भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने या ठिकाणी तातडीने सखोल तांत्रिक तपासणी करून सुरक्षिततेच्या दृष्टीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

