(मुंबई / वृत्तसंस्था)
बॉम्बस्फोटाच्या धमकीमुळे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबई पोलिसांनी त्यांच्या जुहू येथील जलसा बंगल्याभोवती सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे. या पार्श्वभूमीवर दर रविवारी चाहत्यांना भेटण्याची अनेक वर्षांची परंपरा कायम ठेवत अमिताभ बच्चन रविवारी जलसा बंगल्याबाहेर आले. मात्र, यावेळी सुरक्षेच्या दृष्टीने विशेष खबरदारी घेण्यात आली होती. ते बुलेटप्रूफ काचेच्या केबिनमध्ये उभे राहून चाहत्यांना भेटले. यावेळी त्यांनी हात हलवून आणि हात जोडून चाहत्यांचे अभिवादन स्वीकारले.
अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्यानंतर मुंबई पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. रविवारी होणाऱ्या त्यांच्या ‘संडे दर्शन’ कार्यक्रमाच्या वेळी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला होता. बंगल्याबाहेरील बॅरिकेड्सजवळ पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. तसेच जमलेली गर्दी आणि परिसरातील हालचालींवर पोलिसांकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत होते.
दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी अलीकडेच आपल्या ब्लॉगमधून प्रकृतीविषयी माहिती दिली होती. डॉक्टरांनी त्यांना काही दिवस पूर्ण विश्रांती घेण्याचा आणि आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही त्यांनी चाहत्यांना आपल्या प्रकृतीबाबत अपडेट दिले आहेत. प्रकृती अस्वस्थ असतानाही आणि सुरक्षेचे आव्हान निर्माण झालेले असतानाही त्यांनी चाहत्यांशी भेटण्याची परंपरा कायम ठेवली.
या धमकीचे गांभीर्य २३ ऑक्टोबर रोजी समोर आले होते. मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांच्या कार्यालयाला धमकीचा ईमेल प्राप्त झाला होता. या ईमेलमध्ये अमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील जलसा बंगल्यासह गायक-अभिनेता दिलजीत दोसांज यांच्या मुंबईतील कॉन्सर्टला आणि काही शाळांना लक्ष्य करण्याची धमकी देण्यात आली होती.
ईमेलमध्ये ३१ ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबर या कालावधीत जलसा बंगल्याला लक्ष्य केले जाईल, असा उल्लेख करण्यात आला होता. हा धमकीचा संदेश मिळताच पोलिसांनी तातडीने सुरक्षा उपाययोजना केल्या. त्यानंतर जलसा बंगल्याच्या परिसरातील बंदोबस्त वाढवण्यात आला असून, अमिताभ बच्चन यांच्या रविवारी होणाऱ्या चाहत्यांशी भेटीच्या कार्यक्रमातही विशेष सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.


