(नवी दिल्ली / वृत्तसंस्था)
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) लाखो पीएफ खातेधारकांसाठी सेवा अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीने दोन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. आता पीएफ खात्याची माहिती मिळवण्यासाठी कार्यालयात जाण्याची किंवा विविध प्रक्रियांमध्ये अडकण्याची गरज कमी होणार आहे. व्हॉट्सॲपच्या माध्यमातून खातेविषयक सेवा उपलब्ध करून देण्यासोबतच, पात्र निष्क्रिय पीएफ खात्यांमधील शिल्लक रक्कम कोणताही स्वतंत्र दावा न करता थेट बँक खात्यात जमा करण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी ईपीएफओच्या ७४ व्या स्थापना दिनानिमित्त या दोन्ही सुविधांचा प्रारंभ केला.
नवीन व्हॉट्सॲप सेवेमुळे पीएफ सदस्यांना ईपीएफओच्या सत्यापित व्हॉट्सॲप क्रमांकावरून विविध माहिती थेट मोबाईलवर मिळवता येणार आहे. यामध्ये पीएफ खात्यातील उपलब्ध शिल्लक तपासणे, शेवटचे पाच व्यवहार पाहणे आणि पासबुकमधील माहिती मिळवणे या सुविधांचा समावेश आहे. याशिवाय प्रधानमंत्री विकास भारत रोजगार योजनेशी (PMVBRY) संबंधित प्रश्न आणि आवश्यकतांसाठीही व्हॉट्सॲपवर वैयक्तिक मार्गदर्शन व सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.
ईपीएफओने निष्क्रिय पीएफ खात्यांमधील पैसे मिळवण्याची प्रक्रियाही सोपी केली आहे. नव्या स्वयंचलित सेटलमेंट प्रणालीअंतर्गत, एक हजार रुपयांपर्यंत शिल्लक असलेल्या आणि आधार-सत्यापित निष्क्रिय खात्यांमधील रक्कम थेट संबंधित लाभार्थ्यांना मिळणार आहे. यासाठी खातेधारकांना स्वतंत्र दावा अर्ज दाखल करण्याची आवश्यकता राहणार नाही.
या प्रक्रियेत ईपीएफओकडून संबंधित खातेधारकाची ओळख आणि बँक खात्याची पडताळणी केली जाईल. आवश्यक पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पात्र खात्यांच्या सेटलमेंटची प्रक्रिया आपोआप सुरू होईल आणि शिल्लक रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. या सुविधेचा अंदाजे एक लाख पीएफ खातेधारकांना लाभ होण्याची अपेक्षा असून, त्यांच्या खात्यांमध्ये एकूण पाच कोटी रुपये हस्तांतरित केले जाणार आहेत.
दरम्यान, ईपीएफओच्या आर्थिक सामर्थ्याविषयी माहिती देताना केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी संस्थेच्या ७४ वर्षांच्या प्रवासाचा उल्लेख केला. देशातील कर्मचाऱ्यांसाठी ईपीएफओ ही एक विश्वासार्ह संस्था म्हणून विकसित झाली असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या आठ कोटींहून अधिक सदस्यांच्या योगदानातून जमा झालेला ३२ लाख कोटी रुपयांचा निधी ईपीएफओकडे असल्याची माहितीही त्यांनी दिली.
ईपीएफओ लवकरच आपल्या ७५व्या वर्षात प्रवेश करणार असल्याने संस्थेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सेवा अधिक आधुनिक करण्यावर भर द्यावा, असे आवाहनही मांडविया यांनी केले. बदलत्या काळानुसार नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे आणि नाविन्यपूर्ण कल्पना राबवणे आवश्यक आहे. यामुळे पीएफ सदस्यांना अधिक सोप्या आणि प्रभावी पद्धतीने सेवा उपलब्ध करून देता येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.


