(नवी दिल्ली)
भारतीय निवडणूक आयोगाने बुधवारी देशातील १० राज्यांमधील राज्यसभेच्या ३७ जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकांचा सविस्तर कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकांसाठी १६ मार्च रोजी मतदान होणार असून, त्याच दिवशी संध्याकाळी मतमोजणी केली जाणार आहे. या ३७ जागा एप्रिल महिन्यात रिक्त होत आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील ७, ओडिशा ४, तमिळनाडू ६, पश्चिम बंगाल ५, बिहार ५, आसाम ३, छत्तीसगड २, हरियाणा २, तेलंगणा २ आणि हिमाचल प्रदेशातील १ जागेचा समावेश आहे.
बड्या नेत्यांचा कार्यकाळ संपणार
यावेळी राज्यसभेचा कार्यकाळ संपणाऱ्या सदस्यांमध्ये अनेक राष्ट्रीय पातळीवरील नेते आहेत. यामध्ये शरद पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनू सिंघवी, तृणमूल काँग्रेसचे साकेत गोखले तसेच राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायन सिंह यांचा समावेश आहे.
मागील निवडणुकांचा प्रभाव
या जागांसाठी २०२० मध्ये द्विवार्षिक निवडणुका झाल्या होत्या. त्या वेळी भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांनी आसाम, बिहार, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशमध्ये चांगली कामगिरी केली होती. महाराष्ट्रात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात जागांचे विभाजन झाले होते. तमिळनाडूमध्ये डीएमके आघाडीचा वरचष्मा होता, तर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि ओडिशामध्ये बिजू जनता दल यांचा दबदबा दिसून आला होता.
निवडणुकीचं सविस्तर वेळापत्रक
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार,
- २६ फेब्रुवारी : अधिसूचना जाहीर
- ५ मार्च : अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख
- ६ मार्च : अर्जांची छाननी
- ९ मार्च : अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारीख
- १६ मार्च : सकाळी ९ ते दुपारी ४ मतदान
- १६ मार्च : संध्याकाळी ५ वाजता मतमोजणी
- २० मार्चपर्यंत : संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण
मतदानासाठी बॅलेट पेपरवर पसंतीक्रम नोंदवताना फक्त रिटर्निंग ऑफिसरकडून देण्यात आलेला इंटीग्रेटेड व्हायलेट स्केच पेन वापरण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत.
मार्चमध्ये होणाऱ्या या निवडणुकांचे निकाल संबंधित राज्यांच्या विधानसभांमधील विद्यमान संख्याबळावर अवलंबून असतील. त्यामुळे या निवडणुकांमुळे राज्यसभेच्या राजकीय रचनेत काही प्रमाणात बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

