(मुंबई / वृत्तसंस्था)
मोबाईल रिचार्जमध्ये इंटरनेट डेटाची गरज नसलेल्या ग्राहकांसाठी रिलायन्स जिओने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (TRAI) निर्देशांनंतर एअरटेलनंतर आता जिओनेही केवळ व्हॉईस कॉलिंग आणि एसएमएस सुविधा देणारे स्वतंत्र प्रीपेड प्लॅन्स बाजारात आणले आहेत. या प्लॅन्समध्ये मोबाईल इंटरनेट डेटा दिला जाणार नसल्याने ग्राहकांना केवळ आवश्यक सेवांसाठी रिचार्ज करण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे.
जिओने वेगवेगळ्या वैधतेचे सहा व्हॉईस-ओनली प्लॅन्स सादर केले आहेत. यामध्ये १४७ रुपयांच्या प्लॅनमध्ये २२ दिवसांची वैधता, अमर्याद कॉलिंग आणि एकूण ३०० एसएमएस मिळणार आहेत. १७७ रुपयांच्या रिचार्जमध्ये २८ दिवसांची वैधता असून अमर्याद कॉलिंगसह ३०० एसएमएसची सुविधा आहे. १९६ रुपयांचा प्लॅन ३० दिवसांसाठी वैध असून त्यामध्येही अमर्याद कॉलिंग आणि ३०० एसएमएस मिळतील. तर १९७ रुपयांच्या प्लॅनची वैधता संपूर्ण कॅलेंडर महिन्याची असून त्यात अमर्याद कॉलिंग आणि ३०० एसएमएस उपलब्ध आहेत.
दीर्घ मुदतीचे रिचार्ज करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठीही जिओने पर्याय दिले आहेत. ४४८ रुपयांच्या प्लॅनमध्ये ८४ दिवसांची वैधता, अमर्याद कॉलिंग आणि १,००० एसएमएस मिळतील. याशिवाय जिओ टीव्ही आणि जिओ एआय क्लाउडचे सबस्क्रिप्शनही उपलब्ध असेल. १,७४८ रुपयांच्या प्लॅनमध्ये तब्बल ३३६ दिवसांची वैधता देण्यात आली असून अमर्याद कॉलिंग, ३,६०० एसएमएस आणि जिओ टीव्ही व जिओ एआय क्लाउडचे सबस्क्रिप्शन मिळणार आहे.
या सर्व रिचार्ज प्लॅन्सचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये इंटरनेट डेटा समाविष्ट नाही. त्यामुळे नियमित डेटा-बंडल रिचार्जपेक्षा हे प्लॅन्स वेगळे आहेत. मोबाईलवर इंटरनेट वापरण्याची आवश्यकता नसलेल्या ग्राहकांना केवळ कॉलिंग आणि एसएमएससाठी स्वतंत्र रिचार्ज करता येणार आहे.
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) टेलिकॉम कंपन्यांना २१ ऑक्टोबरपर्यंत यासंदर्भात निर्देश दिले होते. ग्राहकांना कमी किमतीत डेटा नसलेले केवळ व्हॉईस कॉलिंग आणि एसएमएसचे प्लॅन्स उपलब्ध करून देणे कंपन्यांसाठी बंधनकारक करण्यात आले होते. या निर्देशांचे पालन करत जिओने नवीन प्लॅन्स सादर केले आहेत. यापूर्वी एअरटेलनेही अशाच प्रकारचे व्हॉईस-ओनली रिचार्ज पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.
साधे फीचर फोन वापरणारे नागरिक, दुसऱ्या क्रमांकासाठी स्वतंत्र सिमकार्ड वापरणारे ग्राहक तसेच घरात किंवा कार्यालयात इंटरनेटसाठी केवळ वाय-फायचा वापर करणाऱ्यांना या प्लॅन्सचा फायदा होऊ शकतो. इंटरनेटची गरज नसतानाही डेटा असलेले महागडे रिचार्ज करावे लागत असल्याने अशा ग्राहकांचा अनावश्यक खर्च होत होता. आता केवळ कॉलिंग आणि एसएमएस सुविधा निवडण्याचा पर्याय उपलब्ध झाल्यामुळे ग्राहकांना आपल्या गरजेनुसार रिचार्ज करता येणार असून मोबाईल खर्चात बचत करण्याची संधी मिळणार आहे.


