(पुणे / वृत्तसंस्था)
पिंपरी-चिंचवडमधील डांगे चौक परिसरातील सिग्नेचर पार्क या उच्चभ्रू सोसायटीत शुक्रवारी (३० ऑक्टोबर) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ३३ वर्षीय महिलेने आपल्या सहा वर्षांच्या मुलासह इमारतीच्या १८व्या मजल्यावरून उडी घेत जीवन संपवले. एकता मनोज भांगड आणि माधव मनोज भांगड अशी मृत मायलेकांची नावे आहेत. या घटनेनंतर पोलिसांना घटनास्थळी महिलेने लिहिलेली सात ते आठ पानी चिठ्ठी मिळाली असून, त्यातून तिच्या दीर्घकालीन आजारामुळे निर्माण झालेला मानसिक आणि शारीरिक त्रास समोर आला आहे.
सिग्नेचर पार्क सोसायटीच्या परिसरात शुक्रवारी सायंकाळी महिला आणि एका लहान मुलाचे मृतदेह आढळून आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक पाहणीत महिलेने मुलासह इमारतीच्या १८व्या मजल्यावरून उडी घेतल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला.
एकता भांगड या पती मनोज आणि सहा वर्षांचा मुलगा माधव यांच्यासह याच सोसायटीत वास्तव्यास होत्या. त्यांचे पती मनोज हे येरवडा येथील एका आयटी कंपनीत इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत. हे कुटुंब मूळचे राजस्थानचे असून, गेल्या दोन वर्षांपासून ते सिग्नेचर पार्कमध्ये राहत होते.
या घटनेच्या तपासादरम्यान पोलिसांना एकता यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेली सात ते आठ पानांची चिठ्ठी मिळाली. त्यामध्ये त्या गेल्या अनेक वर्षांपासून मणक्याच्या गंभीर आजाराने त्रस्त असल्याचा उल्लेख आहे. विविध रुग्णालयांमध्ये उपचार करूनही त्यांच्या आजाराचे नेमके निदान होत नव्हते. त्यामुळे त्यांना सातत्याने असह्य शारीरिक वेदना सहन कराव्या लागत होत्या. या दीर्घकालीन त्रासाला कंटाळून त्यांनी जीवन संपवण्याचा निर्णय घेतल्याचे चिठ्ठीत नमूद असल्याची माहिती समोर आली आहे.
या चिठ्ठीत एकता यांनी पती मनोज यांच्याविषयीचे प्रेमही व्यक्त केले आहे. आपल्या पश्चात पतीने दुसरे लग्न करून नव्याने संसार सुरू करावा आणि आयुष्याची नव्याने सुरुवात करावी, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केले आहे.
मात्र, या घटनेतील सर्वाधिक वेदनादायी बाब म्हणजे सहा वर्षांच्या मुलालाही सोबत नेण्यामागील विचारांचा चिठ्ठीत केलेला उल्लेख. स्वतःच्या मृत्यूनंतर मुलाला आईच्या अनुपस्थितीशी जुळवून घेणे कठीण जाईल आणि तो वारंवार आईची आठवण काढत राहील, अशी भीती त्यांना वाटत होती. तसेच, मुलगा सोबत असल्यास पतीच्या पुनर्विवाहात अडचणी निर्माण होऊ शकतात, असाही विचार त्यांनी चिठ्ठीत मांडल्याची माहिती समोर आली आहे.
दीर्घकाळापासून सुरू असलेल्या आजाराच्या वेदना आणि कौटुंबिक भविष्याबाबतच्या चिंतेतून घडलेल्या या घटनेने पिंपरी-चिंचवड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


