(मुंबई / वृत्तसंस्था)
देशातील मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करणाऱ्या Fame India–Asia Post Survey 2026 मध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अव्वल स्थान पटकावले आहे. १,००० पैकी ८९७ गुण मिळवत त्यांनी देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्री होण्याचा मान मिळवला आहे. दुसरीकडे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मुख्यमंत्री पंचरत्न’ या विशेष श्रेणीत ७८८ गुणांसह पहिले स्थान मिळवले आहे. फेम इंडिया मॅगजीन आणि एशिया पोस्ट यांच्या संयुक्त सर्वेक्षणातून ही क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे.
या सर्वेक्षणात मुख्यमंत्र्यांचे नेतृत्व, प्रशासकीय कार्यक्षमता, लोकप्रियता, कार्यशैली आणि राज्याच्या कारभारावरील पकड अशा विविध बाबींचा विचार करण्यात आला. एकूण १० निकषांच्या आधारे मुख्यमंत्र्यांचे मूल्यांकन करण्यात आले. यामध्ये सुशासन, कायदा आणि सुव्यवस्था, व्यक्तिमत्त्व, प्रतिमा, कार्यक्षमता, विविध खात्यांची समज, लोकप्रियता, दूरदृष्टी, नेतृत्वक्षमता आणि कार्यपद्धती या बाबींचा समावेश होता.
सुशासनाचे मूल्यांकन करताना प्रशासकीय पारदर्शकता, उत्तरदायित्व, नागरिकांना मिळणाऱ्या सेवांची गुणवत्ता आणि प्रशासनाची कार्यक्षमता विचारात घेण्यात आली. कायदा आणि सुव्यवस्थेच्या निकषामध्ये कायद्याचे राज्य प्रस्थापित करणे आणि गुन्हेगारीला आळा घालण्याच्या क्षमतेचा आढावा घेण्यात आला. याशिवाय नेतृत्वगुण, संवादकौशल्य, निर्णयक्षमता आणि सार्वजनिक जीवनातील वर्तन यांचाही अभ्यास करण्यात आला.
या सर्वेक्षणात प्रत्येक मुख्यमंत्र्यांचे मूल्यमापन १,००० गुणांच्या आधारे करण्यात आले. राज्य सरकारची कामगिरी, योजनांची प्रभावी अंमलबजावणी, जनमानसातील स्वीकारार्हता, भविष्यातील नियोजन आणि धोरणात्मक निर्णयांचे परिणाम या बाबींनाही महत्त्व देण्यात आले.
योगी आदित्यनाथ यांनी ८९७ गुण मिळवत पहिला क्रमांक पटकावला. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी ८८१ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ८७४ गुण मिळवत तिसरे स्थान मिळवले. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान ८५६ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहेत.
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन ८४४ गुणांसह पाचव्या, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू ८४२ गुणांसह सहाव्या, सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग ८३८ गुणांसह सातव्या क्रमांकावर आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी ८२७ गुण मिळवत आठवे स्थान मिळवले आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव ८०३ गुणांसह नवव्या, तर मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा ८०२ गुणांसह दहाव्या क्रमांकावर आहेत.
दरम्यान, या सर्वेक्षणात ‘मुख्यमंत्री पंचरत्न’ अशी स्वतंत्र श्रेणीही तयार करण्यात आली असून, त्यामध्ये पाच मुख्यमंत्र्यांची निवड करण्यात आली आहे. या गटात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ७८८ गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता ७६८ गुणांसह दुसऱ्या, तर जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला ७६६ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यांनी ७६० गुणांसह चौथे स्थान मिळवले, तर राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा ७४६ गुणांसह पाचव्या क्रमांकावर राहिले. त्यामुळे देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांच्या मुख्य क्रमवारीत योगी आदित्यनाथ यांनी बाजी मारली असताना, विशेष ‘मुख्यमंत्री पंचरत्न’ श्रेणीत महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस अव्वल ठरले आहेत.


