(मुंबई / वृत्तसंस्था)
मनोरंजन विश्वातून रविवारी आलेल्या दोन दुःखद बातम्यांमुळे चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक संजय गुप्ता यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर ‘बंधन साथ जनमों का’ या मालिकेतून ओळख मिळवलेला अभिनेता अनुज ठाकूर याच्या निधनाचे वृत्तही समोर आले. अवघ्या ३० वर्षांच्या अनुजच्या अचानक जाण्याने त्याचे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि चाहते शोकाकुल झाले आहेत.
अनुजच्या निधनाची माहिती त्याचा जवळचा मित्र आणि कास्टिंग डायरेक्टर रुपेश सोनार यांनी दिली. अनुजला ते मित्रापेक्षा लहान भावाप्रमाणे मानत होते. काही दिवसांपूर्वीच दोघांचे फोनवर बोलणे झाले होते. त्यावेळी अनुज आनंदी होता आणि पुन्हा अभिनय क्षेत्रात सक्रिय होण्यासाठी उत्सुक असल्याचे रुपेश यांनी सांगितले. इतक्या लवकर त्याच्याशी झालेला संवाद शेवटचा ठरेल, याची कल्पनाही नव्हती, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
अनुज आणि रुपेश यांची ओळख २००८ मध्ये ‘बंधन साथ जनमों का’ या मालिकेच्या निमित्ताने झाली होती. त्यानंतर दोघांनी अनेक शोमध्ये एकत्र काम केले. त्यामुळे त्यांच्यात जवळचे मैत्रीचे नाते निर्माण झाले होते.
अनुजच्या निधनाची बातमी ३० ऑक्टोबर रोजी रात्री ८.३० वाजता रुपेश यांना एका मित्राच्या फोनवरून समजली. सुरुवातीला त्यांना या वृत्तावर विश्वास बसला नाही. काही दिवसांपूर्वीच भेट झालेली असल्याने ही बातमी धक्कादायक होती. त्यानंतर त्यांनी अनुजच्या भावाशी संपर्क साधला. दुसऱ्या दिवशी ते त्याच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी गेले. त्यावेळी अनुजचा झोपेतच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे समजल्याचे रुपेश यांनी सांगितले.
अनुजच्या दैनंदिन दिनक्रमाबाबतही रुपेश यांनी माहिती दिली. अनुज रोज पहाटे ४.३० वाजता उठत असे. फिटनेसबाबत तो विशेष जागरूक होता. नियमित जॉगिंग करणे हा त्याच्या दिनक्रमाचा भाग होता. मात्र, ३० ऑक्टोबरच्या पहाटे त्याचा नेहमीप्रमाणे अलार्म वाजत राहिला, तरी तो उठला नाही.
बराच वेळ अनुज उठला नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्याच्या आईला जाग आली. ती त्याच्या केबिनमध्ये गेली असता अनुजचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. रोज पहाटे उठून व्यायाम आणि जॉगिंग करणाऱ्या अनुजच्या आयुष्याचा असा अचानक शेवट झाल्याने त्याच्या मित्रपरिवारासह टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील अनेकांना मोठा धक्का बसला आहे.


