(सातारा)
फलटण तालुक्यात प्रेमसंबंधातून झालेल्या अत्यंत धक्कादायक हत्येचा उलगडा झाला आहे. विवाहित प्रेयसीने आपल्या पती आणि पहिल्या प्रियकराच्या मदतीने दुसऱ्या प्रियकराची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. हत्या केल्यानंतर लाकडे कापण्याच्या मशीनने मृतदेहाचे तुकडे करून ते पोती नीरा नदी आणि शेततळ्यात टाकण्यात आल्याची माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे.
या प्रकरणात सतीश उर्फ आप्पा दादासो दडस (रा. सोमंथळी, ता. फलटण) याची हत्या करण्यात आली आहे. या हत्येप्रकरणी रेश्मा लखन बुधावले, तिचा पती लखन बंडू बुधावले आणि पहिला प्रियकर सतीश तुकाराम माने (रा. विडणी, ता. फलटण) यांना फलटण पोलिसांनी अटक केली आहे.
बेपत्ता तक्रारीतून उलगडा
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात 21 जानेवारी रोजी सागर दादासो दडस यांनी आपला भाऊ सतीश दडस 14 जानेवारीपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. कुटुंबीयांकडून शोध सुरू असतानाही कोणतीही माहिती मिळत नव्हती. दरम्यान, मृताच्या मालकाने दिलेल्या माहितीनंतर संशय बळावला आणि पोलिसांनी तपासाची दिशा बदलली.
तपासात असे निष्पन्न झाले की, संक्रांतीच्या दिवशी दुपारी सतीश दडस याचा लखन बुधावले आणि सतीश माने यांच्यासोबत वाद झाला होता. या वादात प्रेयसीच्या पतीने सतीशच्या डोक्यात लोखंडी रॉड मारल्याने तो गंभीर जखमी झाला.
उपचाराच्या बहाण्याने नेऊन हत्या
जखमी सतीशला उपचारासाठी नेण्याच्या बहाण्याने आरोपींनी विडणी येथील मांगोबामाळ परिसरात नेले. त्यानंतर धुळदेव गावच्या हद्दीतील भिवरकरवाडी येथे पुन्हा डोक्यात दगड घालून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. या संपूर्ण घटनेत रेश्मा बुधावले, तिचा पती आणि पहिला प्रियकर यांचा थेट सहभाग असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
मृतदेहाचे तुकडे करून पुरावे नष्ट
हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींनी लाकडे कापण्याच्या मशीनने मृतदेहाचे तुकडे केले. मुंडके, खांद्यापासून हात आणि गुडघ्यापासून पाय वेगळे करून दोन पोत्यांत भरले. एक पोते नीरा नदीत तर दुसरे पोते शेततळ्यात टाकण्यात आले. आरोपींच्या कबुलीनुसार पोलिसांनी शोधमोहीम राबवून मृतदेहाचे तुकडे जप्त केले आहेत.
पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांनी सांगितले की, तिन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून मृताचे धड सापडले आहे. नीरा नदीत पाण्याची पातळी जास्त असल्याने शोधकार्य सुरू आहे. तिन्ही संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

