(कोल्हापूर / वृत्तसंस्था)
कोल्हापुरातील करवीर निवासिनी आई अंबाबाई मंदिराच्या परिसरात एकेकाळी धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व लाभलेले मणिकर्णिका कुंड काळाच्या ओघात बुजवण्यात आले होते. मंदिराच्या स्थापत्यरचनेचा महत्त्वाचा भाग असलेल्या या प्राचीन कुंडाचे अस्तित्व पुन्हा उजेडात आणण्याचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या पुढाकाराने सुरू असलेल्या पुनरुज्जीवनाच्या कामामुळे या ऐतिहासिक वास्तूचे मूळ स्वरूप पुन्हा पाहायला मिळणार आहे. सुमारे ४० फूट खोल असलेल्या या कुंडाची रचना, दगडी पायऱ्या आणि कपडे बदलण्यासाठी बांधलेल्या ओवऱ्या यांमुळे मंदिराच्या ऐतिहासिक वैभवात आणखी भर पडणार आहे.
दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापुरातील आई अंबाबाई मंदिराच्या घाटी दरवाजाजवळ हे मणिकर्णिका कुंड अस्तित्वात होते. मंदिराच्या बांधकामाला नवव्या शतकात सुरुवात झाली आणि बाराव्या शतकात ते पूर्ण झाले. याच कालखंडात म्हणजे नवव्या ते बाराव्या शतकादरम्यान मणिकर्णिका कुंडाची उभारणी करण्यात आली होती. उत्तर प्रदेशातील काशी येथे असलेल्या मणिकर्णिका घाटाप्रमाणेच कोल्हापुरातही मणिकर्णिका कुंड असल्याने या वास्तूला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. भारतात केवळ दोन ठिकाणी ‘मणिकर्णिका’ नावाने कुंड अस्तित्वात आहेत.
पौराणिक मान्यतेनुसार, करवीर क्षेत्रात आल्यानंतर आई अंबाबाईच्या कानातील कुंडले हरवली होती. ती ज्या ठिकाणी सापडली, त्या जागेला मणिकर्णिका कुंड असे नाव पडले. दक्षिण भारतातील अनेक मंदिरांमध्ये देव आणि देवीच्या स्नानासाठी स्वतंत्र कुंडांची व्यवस्था असते. एका कुंडातील पाण्याचा वापर देवाच्या स्नानासाठी, तर दुसऱ्या कुंडातील पाण्याचा वापर देवीच्या स्नानासाठी केला जातो. कुंडाच्या तळापर्यंत जाण्यासाठी दगडी पायऱ्या असल्याने अशा वास्तूला ‘बारवशिल्प’ असेही संबोधले जाते.
मणिकर्णिका कुंडाला केवळ स्थापत्यशास्त्रीय नव्हे, तर धार्मिक परंपरेच्या दृष्टीनेही महत्त्व आहे. पूर्वी राजघराण्यातील सदस्य जगदंबेच्या दर्शनासाठी येत असत, तेव्हा कुंडाच्या काठावर आपली जुनी वस्त्रे ठेवून नवीन वस्त्रे परिधान केल्यानंतर ते आई अंबाबाईच्या दर्शनाला जात असत. त्यांनी ठेवलेली जुनी वस्त्रे सर्वसामान्यांना उपलब्ध होत असत. साधुसंत, महंत आणि भाविकांनी या कुंडात स्नान करून देवीचे दर्शन घेण्याची परंपराही होती. या प्रथेचा उल्लेख ‘करवीर माहात्म्य’ या ग्रंथात आढळतो.
मात्र, कालांतराने या ऐतिहासिक वास्तूचे मूळ स्वरूप लोप पावले. १९५७ मध्ये ही जागा कोल्हापूर महापालिकेकडे वर्ग करण्यात आली. त्यानंतर महापालिकेने या ठिकाणी प्रथम उद्यान आणि पुढे स्वच्छतागृह उभारले. त्यामुळे धार्मिक महत्त्व असलेल्या कुंडाचे पावित्र्य आणि ऐतिहासिक अस्तित्व जपले गेले नाही. या पार्श्वभूमीवर मणिकर्णिका कुंड पुन्हा विकसित करण्याची मागणी भाविकांकडून होऊ लागली. २०१६ मध्ये यासाठी आंदोलनही करण्यात आले होते.
यानंतर पुरातत्त्व विभाग आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने पुढाकार घेत या परिसरात पुन्हा उत्खनन केले. मणिकर्णिका कुंडाचे ऐतिहासिक अस्तित्व आणि मूळ रचना जतन करून त्याचे पुनरुज्जीवन करण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. आता या कामाने ९५ टक्के पूर्णत्व गाठले असून, मूळ वास्तूचा ढाचा कायम ठेवून पुनर्बांधणी करण्यात आली आहे.
या कुंडाची रचना चौकोनी असून, त्यामध्ये सुमारे ४० फूट खोल असलेली दोन स्वतंत्र कुंडे आहेत. तळापर्यंत जाण्यासाठी दगडी पायऱ्या बांधण्यात आल्या असून, राजदरबारातील रचनेप्रमाणे कपडे बदलण्यासाठी ओवऱ्यांची व्यवस्थाही करण्यात आली आहे. मंदिराच्या प्राचीन स्थापत्यशैलीशी सुसंगत असलेली ही रचना मणिकर्णिका कुंडाचे वैशिष्ट्य ठरत आहे. उत्तर भारतातील काशी आणि दक्षिणेतील करवीर नगरी अर्थात दक्षिण काशी यांच्यातील साम्याच्या दृष्टीनेही या कुंडाचे महत्त्व अधोरेखित होते. मणिकर्णिका कुंडाचे पुनरुज्जीवन पूर्णत्वाकडे जात असल्याने ते लवकरच भाविकांसाठी खुले होण्याची शक्यता आहे. दगडी बांधकाम, आकर्षक ओवऱ्या आणि पायऱ्यांमुळे मंदिराच्या परिसरातील या ऐतिहासिक वास्तूला पुन्हा पूर्वीचे वैभव प्राप्त होणार आहे.
दरम्यान, स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आई अंबाबाई मंदिराच्या सौंदर्यातही आगामी काळात भर पडणार आहे. मंदिराच्या विशिष्ट रचनेमुळे वर्षातून दोन वेळा किरणोत्सव साजरा केला जातो. सध्या मंदिरातील गरुड मंडप उभारणीचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे. नगारखाना आणि मणिकर्णिका कुंडाचे काम पूर्ण झाल्यानंतर मंदिराच्या ऐतिहासिक वास्तूवैभवात आणखी भर पडणार आहे. त्यामुळे देशभरातून येणाऱ्या आई अंबाबाईच्या भाविकांमध्ये या प्राचीन कुंडाचे पुनरुज्जीवन पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे.


