(मुंबई)
राज्यातील महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला मोठा प्रतिसाद मिळत असून सध्या जवळपास दोन कोटींपेक्षा अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे. अडीच लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना या योजनेअंतर्गत दरमहा 1,500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.
योजनेच्या लाभासाठी राज्य सरकारने लाभार्थी महिलांना e-KYC पूर्ण करण्याचे आवाहन केले होते. e-KYC करण्याची मुदत संपल्यानंतर आता या प्रक्रियेबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावरील ‘एक्स’ या अधिकृत खात्यावरून यासंदर्भात माहिती दिली आहे.
त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, तसेच त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबवली जात आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना 31 डिसेंबर 2025 पर्यंत e-KYC करण्याची मुदत देण्यात आली होती.
मात्र, काही लाभार्थी महिलांनी e-KYC प्रक्रियेदरम्यान चुकून चुकीचा पर्याय निवडल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा महिलांचा लाभ बंद होऊ नये, यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. योजनेच्या निकषांनुसार संबंधित लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी (फिजिकल व्हेरिफिकेशन) करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
या निर्णयामुळे पात्र महिलांना योजनेचा लाभ कायम राहणार असून, चुकीमुळे वंचित राहण्याची भीती दूर झाली आहे.

