(मुंबई)
राज्यात 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) लागू करण्यात येणार असून, त्याअंतर्गत अंगणवाडी सेविकांना शिक्षिका म्हणून दर्जा देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या धोरणानुसार, “खेळत खेळत शिक्षण” या तत्त्वाला प्राधान्य देण्यात आले असून, लहान मुलांना अक्षर, अंक, रंग, आकार, उच्चार व मुळाक्षरे यांचे प्रभावी शिक्षण अंगणवाडी सेविकांकडूनच देण्यात येणार आहे. यामुळे, सेविकांची पारंपरिक देखरेख केंद्रित भूमिका आता एका सर्जनशील आणि सक्रिय शिक्षिकेच्या भूमिकेत बदलणार आहे.
नवीन अभ्यासक्रम आणि प्रशिक्षणाची अंमलबजावणी
राज्याच्या शालेय शिक्षण विभागामार्फत, अंगणवाडी आणि इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठीचा अभ्यासक्रम पूर्णतः नव्याने रचला जाणार आहे. यासाठी, प्राथमिक शिक्षकांप्रमाणेच अंगणवाडी सेविकांनाही विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
राज्यातील ५५३ एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत १,१०,५५६ अंगणवाड्या कार्यरत आहेत, आणि त्यामध्ये सव्वा लाखांहून अधिक सेविका कार्यरत आहेत. या सेविकांना शैक्षणिक पात्रतेनुसार बालशिक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे:
- इयत्ता बारावी उत्तीर्ण सेविकांना – ६ महिन्यांचे ऑनलाईन प्रशिक्षण
- इयत्ता दहावी उत्तीर्ण सेविकांना – १ वर्षाचा बालशिक्षण अभ्यासक्रम
या प्रशिक्षणात शिक्षणतंत्र, अध्यापन कौशल्ये, बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त उपक्रम, आणि पालकांच्या सहभागाचे महत्त्व यांचा समावेश असणार आहे.
‘डायट’मार्फत कार्यशाळांची मालिका
या बालशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) मार्फत एकूण ८ कार्यशाळा आयोजित केल्या जाणार असून, यातील २ कार्यशाळा पूर्ण झाल्या आहेत. हे प्रशिक्षण सेविकांना ३ ते ६ वर्षे वयोगटातील मुलांचे समायोजन व शिक्षण अधिक प्रभावी पद्धतीने करता येईल, यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
शाळेच्या पटसंख्येत वाढीची शक्यता
नव्या धोरणामुळे अंगणवाडी सेविकांची भूमिका केवळ देखरेख करणारी नसून, प्रत्यक्ष अध्यापन करणाऱ्या ‘शिक्षिका’ म्हणून ओळखली जाईल. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्येत वाढ होण्याची शक्यता असून, ग्रामीण आणि शहरी भागात शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासही हातभार लागणार आहे.
नवीन शैक्षणिक धोरणामुळे अंगणवाडी सेविकांच्या जबाबदाऱ्या आणि ओळखीत आमूलाग्र बदल होत असून, त्या लवकरच “शिक्षिका” म्हणून बालकांच्या शैक्षणिक प्रवासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहेत.