( जळगाव / वृत्तसंस्था )
जळगाव तालुक्यातील भोकर येथील स्टेट बँकेच्या शाखेवर झालेल्या सशस्त्र दरोड्याच्या तपासात धक्कादायक माहिती समोर येत आहे. तब्बल २७ किलो सोने आणि १२ लाख रुपयांहून अधिक रोकड लुटल्याच्या या घटनेत चार संशयितांचा सहभाग असून, या कटातील प्रमुख संशयित म्हणून माजी पोलीस उपनिरीक्षक शंकर रमेश जासक याचे नाव पुढे आले आहे. एकेकाळी पोलीस दलात अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या जासकचा गंभीर गुन्ह्यांतील सहभाग, त्याची बडतर्फी आणि कारागृहात झालेली इतर संशयितांशी ओळख यामुळे या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे.
शंकर रमेश जासक (वय ४३) हा मूळचा जळगाव येथील रहिवासी असून त्याचे शिक्षण बी.ए.पर्यंत झाले आहे. महाराष्ट्र पोलीस दलाच्या २०१५ मधील ११३ व्या बॅचमधून त्याची पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) म्हणून नियुक्ती झाली होती. त्यानंतर रायगड जिल्हा पोलीस दलात त्याने सेवा बजावली. मात्र, पोलीस सेवेत असतानाच त्याच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होण्यास सुरुवात झाली.
महाड (जि. रायगड) येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळा कारवाईशी संबंधित प्रकरणात २७ डिसेंबर २०१८ रोजी महाड पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. या कारवाईनंतर त्याला पोलीस सेवेतून निलंबित करण्यात आले होते. पुढे तत्कालीन पोलीस अधीक्षक अशोक धुडे यांनी जून २०२१ मध्ये त्याचे निलंबन रद्द करून पुन्हा सेवेत घेतले. त्यानंतर त्याची रायगड जिल्हा नियंत्रण कक्षात नियुक्ती करण्यात आली.
मात्र, जळगाव शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या स्टेट बँकेतील दरोडा प्रकरणात त्याचे नाव आरोपी म्हणून समोर आले. २०२३ मध्ये दाखल झालेल्या या गुन्ह्यात शंकर जासक याच्यासह त्याच्या वडिलांचा आणि संबंधित बँकेत शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या त्याच्या मेहुण्याचाही आरोपी म्हणून समावेश होता. या प्रकरणी गुन्हा क्रमांक ९३/२०२३ अन्वये भारतीय दंड विधानाच्या कलम ३९४ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत तत्कालीन विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण पवार यांनी २०२३ मध्ये जासकला पोलीस सेवेतून बडतर्फ केले. या २०२३ मधील दरोड्यात शंकर जासकने आपल्या शालकाच्या मदतीने स्टेट बँकेतून तब्बल ३.१७ कोटी रुपयांची लूट केल्याची माहिती समोर आली आहे. या गुन्ह्यानंतर तो कारागृहात होता. साधारण दोन ते तीन महिन्यांपूर्वी तो जामिनावर बाहेर आल्याची प्राथमिक माहिती आहे.
भोकर येथील दरोड्याच्या तपासात जासकची गजानन राजेंद्र पवार याच्याशी असलेली कारागृहातील ओळख महत्त्वाचा दुवा ठरली. गजानन पवार हा २०२४ मध्ये चाळीसगाव शहरालगत अनैतिक संबंधातून आपल्या प्रेयसीच्या पतीच्या खुनाच्या गुन्ह्यात कारागृहात होता. या प्रकरणात तोही साधारण दीड महिन्यापूर्वी जामिनावर बाहेर आला होता. जळगाव मध्यवर्ती कारागृहात असतानाच शंकर जासक आणि गजानन पवार यांची ओळख झाली. या ओळखीतून दोघांनी एकत्र येत टोळी तयार केली आणि दरोड्याचा कट आखल्याची माहिती पोलीस तपासातून समोर येत आहे. त्यानुसार आणखी दोन साथीदारांना सोबत घेऊन त्यांनी भोकर येथील स्टेट बँकेला लक्ष्य केले.
दरोड्याच्या दिवशी चारही आरोपींनी बँकेत प्रवेश केल्यानंतर छऱ्याच्या पिस्तुलाचा धाक दाखवून व्यवस्थापक आणि कॅशियरला धमकावले. दोघांच्या डोक्याला पिस्तूल लावून बँकेतील तब्बल १६ लॉकर उघडण्यास भाग पाडण्यात आले. त्यातील सोने बॅगांमध्ये भरून आरोपींनी लूट केली. यावेळी देशी कट्ट्यातून गोळी झाडून बँकेतील कर्मचाऱ्यांमध्ये दहशत निर्माण करण्यात आली. बँक कर्मचारी आणि व्यवस्थापकाला बांधून त्यांच्या तोंडाला पट्टी लावण्यात आली होती.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तब्बल ४० ते ४५ मिनिटे बँकेत होते. पाच ते सहा बॅगांमध्ये सोने आणि रोकड भरून त्यांनी घटनास्थळावरून पलायन केले. सुरुवातीला दोन मोटारसायकलींवरून सहा बॅगा घेऊन पसार झालेल्या आरोपींनी पळून जाताना काही बॅगा रस्त्याच्या बाजूला फेकून दिल्या.
दरोड्यानंतर शंकर जासक आणि गजानन पवार धरणगावच्या दिशेने पळाले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच भोकरमधील ग्रामस्थांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. दुसरीकडे, संपूर्ण जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेला सतर्क करण्यात आले होते. पळून जात असताना आरोपींनी चावलखेड्याजवळ जवळील चार बॅगा रस्त्याच्या बाजूला फेकून दिल्या. या ठिकाणी बॅगा पडल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली.
माजी पोलीस उपनिरीक्षक असल्याने शंकर जासकला पोलीस यंत्रणेची कार्यपद्धती, तपासाची दिशा आणि कायदेशीर प्रक्रियेची माहिती असल्याचे या तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहे. मात्र, भोकर येथील दरोड्याचे नियोजन करण्यात त्याची नेमकी भूमिका काय होती, इतर संशयितांना त्याने कशा प्रकारे सहभागी करून घेतले आणि दरोड्याची आखणी कशी करण्यात आली, याबाबतचा सविस्तर उलगडा पोलीस तपासातून होणे अपेक्षित आहे. खाकी वर्दीतून पोलीस सेवेला सुरुवात करून निलंबन, पुन्हा नियुक्ती, गंभीर गुन्ह्यातील आरोपी आणि बडतर्फी असा प्रवास झालेल्या जासकचे नाव पुन्हा एका मोठ्या बँक दरोड्याच्या तपासात समोर आल्याने या प्रकरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


