सध्या सोशल मीडियावर एक विचित्र पण गोंडस अशी “लाबूबू डॉल” जबरदस्त व्हायरल होत आहे. मोठे डोळे, बाहेर आलेले दात आणि एक राक्षसी हास्य असलेली ही बाहुली पाहताक्षणी थोडी भीतीदायक वाटते, पण तिची लोकप्रियता मात्र अफाट आहे. अनेक सेलिब्रिटी आणि प्रसिद्ध व्यक्तींनी तिला ‘फॅशन स्टेटमेंट’ म्हणून स्वीकारले असून, ती आता जगभरातली ट्रेंडी बाहुली बनली आहे. या डॉलची इतकी मागणीमध्ये आहे की, तिची किंमत लाखो रुपयांपर्यंत पोहोचली आहे. बाजारात लाबूबू डॉलचे चावीला लावणारे शोभिवंत (keychains) आणि इतर संग्रहणीय वस्तूही उपलब्ध आहेत.
लाबूबू डॉल म्हणजे नेमके काय?
लाबूबू ही हाँगकाँगमधील डिझायनर केसिंग लंग यांनी डिझाइन केलेली एक काल्पनिक बाहुली आहे. ती पॉप मार्ट या चिनी कंपनीमार्फत विकली जाते. ही डॉल ‘The Monsters’ या कथामालिकेतील एक पात्र आहे, जी नॉर्डिक पौराणिक कथा आणि लोककथांपासून प्रेरित आहे. लाबूबू डॉलचे रूप जितके वेगळे आणि भयानक आहे, तितकेच ती गोंडस व आकर्षकही आहे. याच वैशिष्ट्यांमुळे ती आजच्या तरुणांमध्ये स्टाईलचे प्रतीक बनली आहे.
लाबूबू डॉलची प्रसिद्धी चीनमधून सुरू झाली. पॉप मार्टने ती २०१९ मध्ये ‘ब्लाइंड बॉक्स’ पद्धतीने विकायला सुरुवात केली. म्हणजे ग्राहकाला कोणती बाहुली मिळेल हे अगदी नशिबावर अवलंबून असते. ही लकी ड्रॉसारखी संकल्पना लोकांना खूपच आकर्षित करते. त्यामुळे अनेकजण आपली आवडती बाहुली मिळवण्यासाठी पुन्हा पुन्हा बॉक्स खरेदी करत आहेत. लाबूबू डॉलच्या अनोख्या रचनेसोबतच तिची विक्रीची पद्धत आणि सोशल मीडियावरील प्रभावशाली लोकांचा सहभाग यामुळे डॉलची लोकप्रियता झपाट्याने वाढली आहे. अनेक अभिनेते, सेलिब्रिटी आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनी लाबूबू डॉलसोबतचे फोटो किंवा व्हिडिओ पोस्ट करून तिला एक ‘ट्रेंड’ बनवले आहे. हेच तिच्या विक्रीमागचे खरे यश आहे.
बर्याच लोकांना प्रश्न पडतो की, लाबूबू डॉलच्या विचित्र रूपामागे काही ऐतिहासिक किंवा सांस्कृतिक कारण आहे का? त्याचे उत्तर म्हणजे – नाही. लाबूबू डॉलचा कोणत्याही ऐतिहासिक किंवा पारंपरिक संदर्भाशी थेट संबंध नाही. ती केवळ एक कल्पनारम्य पात्र आहे, जी नॉर्डिक पौराणिक कथा आणि लोकसाहित्याने प्रेरित आहे. तिचे डिझायनर केसिंग लंग हे नेदरलँड्समध्ये वाढले असून, त्यांनी तयार केलेल्या ‘The Monsters’ या कथामालिकेचा लाबूबू हा महत्त्वाचा भाग आहे.

