( मुंबई )
दक्षिण मुंबईतील अत्यंत वर्दळीच्या डी. बी. मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडपणे सुरू असलेल्या हायप्रोफाईल दलालीचा पर्दाफाश झाला आहे. रस्त्यावर उभे राहून ये-जा करणाऱ्या पुरुषांना अडवत मोबाईलवर तरुणींचे फोटो दाखवून ग्राहक शोधणाऱ्या एका दलालाला पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दयानंद बिल्डिंग परिसरात संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती डी. बी. मार्ग पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिस पथकाने परिसरात पाळत ठेवली. यावेळी एक व्यक्ती रस्त्यावरून जाणाऱ्या पुरुषांना थांबवून मोबाईलमधील मुलींचे फोटो दाखवत असल्याचे आढळून आले.
तत्काळ कारवाई करत पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीचे नाव मुकेश यादव असल्याचे निष्पन्न झाले. चौकशीत त्याने वेश्याव्यवसायासाठी ग्राहक मिळवून देण्याचे काम करत असल्याची कबुली दिली आहे. तो ग्राहकांशी थेट संपर्क साधून व्हॉट्सअॅपवरही मुलींचे फोटो पाठवत, व्यवहार निश्चित करून त्यातून मोठी दलाली घेत असल्याचे उघड झाले आहे.
पोलिसांनी आरोपीचा मोबाईल फोन जप्त केला असून त्यातील चॅट्स, फोटो आणि संपर्कांची सखोल तपासणी सुरू आहे. या प्रकरणात आणखी कोण कोण सहभागी आहेत, तसेच मुलींना कुठून आणि कशा पद्धतीने या रॅकेटमध्ये ओढले जात होते, याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
डी. बी. मार्ग पोलीस या संपूर्ण दलाली नेटवर्कच्या मुळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असून, गजबजलेल्या परिसरात उघडपणे सुरू असलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्येही तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.

