(मुंबई)
कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या नागरकोइल – गांधीधाम – नागरकोइल साप्ताहिक एक्सप्रेस (गाडी क्रमांक 16336/16335) च्या डब्यांच्या रचनेत महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. ५ ऑगस्ट २०२५ पासून ही गाडी सुधारित संरचनेसह धावणार असल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने दिली आहे. सध्या ही एक्सप्रेस २२ एलएचबी डब्यांसह धावत असून, त्यामध्ये २ टियर एसी – १, ३ टियर एसी – ६, स्लीपर – ८, जनरल – ४, पॅन्ट्री कार – १, जनरेटर कार – १ आणि एसएलआर – १ अशा डब्यांचा समावेश आहे.
अशी असेल सुधारित रचना
प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार, या गाडीतील एक स्लीपर डबा कमी करून त्याऐवजी एक अतिरिक्त २ टियर एसी डबा जोडण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना अधिक आरामदायक प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. सुधारित रचना पुढीलप्रमाणे असेल:
- २ टियर एसी – २
- ३ टियर एसी – ६
- स्लीपर – ७
- जनरल डबे – ४
- पॅन्ट्री कार – १
- जनरेटर कार – १
- एसएलआर (SLR) – १
एकूण डबे – २२ (एलएचबी प्रकार)
सुविधांचा दर्जा वाढवण्यावर भर
या बदलामुळे विशेषतः लांब पल्ल्याच्या प्रवाशांसाठी वातानुकूलित डब्यांची उपलब्धता वाढणार आहे. कोकण रेल्वे प्रशासनाने सांगितले की, प्रवाशांच्या वाढत्या मागणीनुसार आणि सोयीसाठी ही रचना बदलण्यात आली असून, यामुळे सेवा अधिक गुणवत्तापूर्ण होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.