(ठाणे)
उल्हासनगरमधून एक हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका सोन्याच्या दुकानात काम करणाऱ्या व्यक्तीने आर्थिक अडचणीतून टोकाचे पाऊल उचलत, पत्नी पत्नी नेहा पाहुजा (४८) आणि १६ वर्षीय रोशनी पाहुजा (मुलगी)ची हत्या करून स्वतःही आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली.
आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव पवन पाहुजा आहे. प्राथमिक माहितीनुसार, सहा महिन्यांपूर्वी धाकट्या मुलाचा मृत्यू, तसेच व्यवसायात आलेल्या आर्थिक अपयशामुळे तणावग्रस्त झालेल्या पवनने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे. विशेष म्हणजे, केवळ चार दिवसांपूर्वी पवनच्या मुलीने दहावीच्या परीक्षेत उत्तम गुण मिळवले होते.
उल्हासनगर कॅम्प क्रमांक १ येथील झुलेलाल मंदिर रोडलगत हर्षा कॉटेज इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर पवन आपल्या भावांच्या कुटुंबासह राहत होते. त्यांच्यासोबत पत्नी नेहा आणि १६ वर्षीय मुलगी रोशनी होती. पवन हे स्थानिक सोनार गल्लीमध्ये दागिने तयार करण्याचे काम करत होते. मात्र, काही काळापासून त्यांच्यावर आर्थिक अडचणींचे आणि वैयक्तिक दुःखाचे मोठे ओझे होते. या मानसिक तणावात बुधवारी रात्री दीडच्या सुमारास पवनने प्रथम पत्नी नेहा आणि मुलगी रोशनी यांची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर स्वतःही गळफास घेऊन जीवन संपवले.
व्हिडिओमध्ये सांगितली दु:खाची कहाणी
पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्येपूर्वी पवनने एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. त्यात त्याने आर्थिक अडचणींमुळे आपले आयुष्य संपवत असल्याचे सांगितले. त्याने संपूर्ण घटनेची जबाबदारी स्वतःवर घेतली असून, यासाठी इतर कोणालाही दोष देऊ नये, असेही स्पष्टपणे नमूद केले आहे. ही घटना संपूर्ण परिसराला हादरवून टाकणारी ठरली असून, पाहुजा कुटुंबाच्या निधनाने स्थानिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
शेजाऱ्यांनी काय सांगितले
माध्यम प्रतिनिधींशी बोलताना पीडित कुटुंबाचे शेजारी आणि मित्रांनी सांगितले की, पाहुजा नेहमीच आपल्या अडचणींबद्दल त्यांच्याशी चर्चा करत असे आणि अनेक वेळा आत्महत्येचा उल्लेख करत असे. अधिकाऱ्याने सांगितले की, पाहुजाच्या एका मित्राच्या माहितीनुसार त्याने एक व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे, ज्यामध्ये त्याने या टोकाच्या पावलामागील कारणे सांगितली आहेत, तसेच त्याला फसवणूक करणाऱ्या आणि मानसिक त्रास देणाऱ्या काही व्यक्तींचा उल्लेखही केला आहे. पोलीसांनी हा व्हिडिओ ताब्यात घेतला असून त्याबाबत चौकशी सुरू आहे.