( नाशिक )
Tata Consultancy Services (TCS) मधील कथित धर्मांतर प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान हिला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. महिनाभर फरार असलेल्या निदा खानला नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ताब्यात घेतले. शुक्रवारी तिला नाशिकरोड न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता सुनावणी ‘इन कॅमेरा’ पद्धतीने पार पडली. सरकारी पक्षाकडून विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी पोलीस कोठडीची मागणी केली होती. तर बचाव पक्षाने निदा खान गर्भवती असल्याचा मुद्दा उपस्थित करत जामिनाची मागणी केली. मात्र न्यायालयाने ती फेटाळून लावत पोलीस कोठडी मंजूर केली.
छत्रपती संभाजीनगरातून ताब्यात
निदा खानचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर ती फरार झाली होती. तपासादरम्यान ती छत्रपती संभाजीनगरातील नारेगाव भागात लपल्याची माहिती एसआयटीला मिळाली. त्यानंतर नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्याशी संपर्क साधून संयुक्त कारवाई केली. तपासात स्थानिक नगरसेवक मतीन पटेल यांनी निदा खानला आश्रय दिल्याचे समोर आले आहे. साध्या वेशातील 20 हून अधिक पोलिसांनी दोन दिवस परिसरावर नजर ठेवून अखेर तिला गोपनीय पद्धतीने ताब्यात घेतले.
मोबाईलमधून महत्त्वाचे डिजिटल पुरावे
तपासादरम्यान निदा खान भिवंडी, मुंब्रा आणि छत्रपती संभाजीनगर येथे फिरत असल्याचे समोर आले. डिजिटल ट्रॅकिंगच्या मदतीने पोलिसांनी तिचा माग काढला. सरकारी पक्षाच्या म्हणण्यानुसार, निदा खानच्या मोबाईलमध्ये पीडितेला धर्मांतरासाठी प्रवृत्त करणारे कथित चिथावणीखोर व्हिडिओ आणि सामग्री आढळली आहे. मोबाईल डेटा रिकव्हर केल्यानंतर आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रकरणात निदा खानला आश्रय दिल्याच्या आरोपावरून मतीन पटेल यालाही सहआरोपी करण्यात आले आहे. “कायदेशीर प्रक्रियेत अडथळा आणणाऱ्यांवर आणि आरोपींना मदत करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल,” असे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्पष्ट केले.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
पीडित तरुणीची ओळख 2022 मध्ये कॉलेजदरम्यान आरोपी दानिश शेख याच्याशी झाली होती. पीडितेच्या तक्रारीनुसार, नोकरीचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार करण्यात आले. तसेच आरोपी दानिश शेख, तौसिफ अख्तर आणि निदा खान यांनी संगनमत करून तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा आरोप आहे. पीडितेने तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, तिच्या धर्माबद्दल आक्षेपार्ह वक्तव्ये करण्यात आली. तिला नमाज, हिजाब आणि बुरख्यासंदर्भात प्रशिक्षण दिल्याचा दावा तपासात करण्यात आला आहे. तिचे नाव बदलून ‘हनिया’ ठेवण्यात आल्याचाही आरोप आहे.
गर्भवती असल्याने विशेष परवानगी
निदा खान गर्भवती असल्याने न्यायालयाने तिला दिवसातून दोन वेळा आईला भेटण्याची परवानगी दिली आहे. तसेच वैद्यकीय सहाय्य उपलब्ध करून देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. दरम्यान, या प्रकरणाचा तपास अधिक व्यापक करण्यात आला असून मालेगाव आणि परदेशातील काही कनेक्शनचीही चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

