(देवळे / प्रकाश चाळके)
प्रत्येक व्यक्तीला आत्मसन्मानाने जगण्याचा अधिकार असून, हा अधिकार प्रत्येकाला मिळावा यासाठी भारतीय मानवाधिकार असोसिएशन देशभर सातत्याने जनजागृती करत आहे. अन्याय आणि अत्याचाराच्या घटनांमध्ये पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच समाजात सलोखा निर्माण करण्यासाठी संघटना विविध उपक्रमांच्या माध्यमातून कार्यरत आहे, असे प्रतिपादन संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनुराग चंद्रवंशी यांनी केले.
भारतीय मानवाधिकार असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्य शाखेची विशेष सभा ठाणे येथे आयोजित करण्यात आली होती. या सभेला दिल्लीहून आलेले संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनुराग चंद्रवंशी, मान्यवर अतिथी, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात चंद्रवंशी यांनी संस्थेच्या देशभरातील कार्याचा आढावा घेतला. देशातील जवळपास १७ राज्यांमध्ये ७५ हजारांहून अधिक स्वयंसेवकांच्या माध्यमातून संघटना कार्यरत असून, मानवकल्याणासाठी विविध उपक्रम राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
मानवी हक्कांना संयुक्त राष्ट्रसंघानेही मान्यता दिली असून, भारतीय राज्यघटनेत ‘Right to live with Dignity’ अर्थात आत्मसन्मानाने जगण्याचा अधिकार अधोरेखित करण्यात आला आहे. या तत्त्वानुसार संस्था सरकारसोबत काम करत आहे. विविध ठिकाणी अन्याय-अत्याचाराच्या घटना घडल्यास सामंजस्याने आणि आवश्यकतेनुसार कायदेशीर मार्गाने हस्तक्षेप करून सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. ‘सुरक्षा का द्वार यही मानवाधिकार’ या ब्रीदवाक्याने संस्थेचे कार्यकर्ते समाज आणि देशाच्या विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे चंद्रवंशी यांनी नमूद केले.
भारतीय कुटुंबव्यवस्थेतील वाढता तणाव आणि पती-पत्नीमधील मतभेद याविषयीही त्यांनी चिंता व्यक्त केली. पती-पत्नीमधील वाढता बेबनाव आणि नातेसंबंधांमधील तणाव दूर करण्यासाठी संस्थेचा ‘मॅचमाईंड’ हा उपक्रम प्रभावी पर्याय ठरू शकतो, असे त्यांनी सांगितले. या उपक्रमाचे महत्त्व राष्ट्रीय महिला आयोग, भारत सरकार यांनीही मान्य केले आहे. या माध्यमातून काही राज्यांमध्ये विवाहपूर्व समुपदेशन केंद्रे सुरू करण्यात आली असून, लवकरच महाराष्ट्रातही अशी केंद्रे सुरू केली जातील, असे आश्वासन अनुराग चंद्रवंशी यांनी दिले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि राष्ट्रगीताने झाली. संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनुराग चंद्रवंशी यांचे स्वागत महाराष्ट्र राज्यप्रमुख गजानन लाड यांनी केले. अन्य मान्यवरांचे स्वागत सौ. आरती कांबळे, सौ. जयश्री शिंदे आणि सौ. तन्वी चाळके यांनी केले. सभेची प्रस्तावना आणि सूत्रसंचालन गजानन फडकले यांनी केले.
यावेळी मुंबई २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात विशेष कामगिरी केल्याबद्दल पोलीस अधिकारी श्री. चाळके यांचा राष्ट्रीय अध्यक्ष अनुराग चंद्रवंशी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि हार देऊन सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र राज्यप्रमुख प्रशासकीय समितीचे गजानन लाड यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. मानवाधिकार कार्यकर्त्यांचे काम पोलीस प्रशासन आणि न्यायालयीन प्रशासनाच्या कामकाजाशी समकक्ष असल्याचे सांगत, प्रत्येक कार्यकर्त्याला कायदा आणि भारतीय राज्यघटनेचा अभ्यास असणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासाठी संस्थेच्या वतीने वेळोवेळी कार्यशाळा आयोजित केल्या जातात. मानवाधिकार रक्षक म्हणून काम करताना या कार्यशाळांचा आणि कायद्याच्या अभ्यासाचा निश्चितच उपयोग होतो, असे त्यांनी सांगितले. पुढील नोव्हेंबर महिन्यात छत्तीसगड राज्यातील बिलासपूर येथे होणाऱ्या वार्षिक राष्ट्रीय अधिवेशनाची माहिती देऊन सर्वांनी या अधिवेशनाला उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
या विशेष सभेला कोकण विभागातील सहा आणि पश्चिम महाराष्ट्रातील चार अशा एकूण दहा जिल्ह्यांतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला पदाधिकारी सौ. आरती कांबळे, सौ. तन्वी चाळके, सौ. जयश्री शिंदे, सौ. श्रेयश्री गोडांबे आणि सौ. पद्मजा इंगळे, सौ. हेमलता रोकडे तसेच पुरुष पदाधिकारी शुभम कदम, डॉ. विनोद वाणी, अशोक फडकले आणि अजय चौधरी यांनी विशेष मेहनत घेतली. त्यांच्या योगदानाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनुराग चंद्रवंशी यांनी कौतुक करून सर्वांचे आभार मानले.


