(रत्नागिरी / प्रतिनिधी)
मिरकरवाडा जेटी क्रमांक २ येथील पानटपरीसमोर किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्याची घटना ३१ ऑक्टोबर रोजी घडली. समद खत्री (पूर्ण नाव माहीत नाही, रा. मिरकरवाडा) याने पानटपरी चालक वसी अब्दुल रेहमान डोना (१९) आणि त्याचा भाऊ नफिज अब्दुल रेहमान डोना (२२) यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. यावेळी चावीने केलेल्या वारात नफिज याचा उजवा कान फाटून रक्तस्राव झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तसेच दुकानातील साहित्याची तोडफोड करून दोघांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३१ ऑक्टोबर रोजी रात्री १२.१० वाजण्याच्या सुमारास मिरकरवाडा जेटी क्रमांक २ येथील पानटपरीसमोर ही घटना घडली. फिर्यादी वसी डोना हे काम करीत असलेल्या ठिकाणी संशयित आरोपी समद खत्री आला. कोणतेही कारण नसताना त्याने वसी आणि त्याचा भाऊ नफिज यांना हाताच्या थापटाने पाठीवर व मानेवर मारहाण केली. त्यानंतर खिशातून चावी काढून नफिज याच्या उजव्या कानावर वार केला. या हल्ल्यात त्याचा कान फाटून रक्तस्राव झाला. एवढ्यावरच न थांबता आरोपीने पाण्याच्या बाटल्यांची केस उचलून नफिज याच्या डोक्यावर मारल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकारात पानटपरीतील साहित्याची तोडफोड करून नुकसान करण्यात आले. तसेच दोन्ही भावांना शिवीगाळ करत घरात घुसून मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही फिर्यादीने केला आहे. या प्रकरणी वसी अब्दुल रेहमान डोना यांच्या फिर्यादीवरून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे ४.०५ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित आरोपी समद खत्री याच्याविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२) आणि ३२४(२) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस करीत आहेत.


