(रत्नागिरी / प्रतिनिधी)
पर्यटन हंगामामुळे जिल्ह्यात पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असतानाच जिल्ह्यातील सीएनजी पंपांवर वाहनांच्या लांबलचक रांगा लागण्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विशेषतः सुट्यांच्या दिवसांत सीएनजीची मागणी अचानक वाढत असल्याने पुरवठा अपुरा पडत असून, वाहनचालक आणि रिक्षा व्यावसायिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. किमान पर्यटनाच्या गर्दीच्या काळात तरी सीएनजीचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीनंतर देशभरात इंधनटंचाईची शक्यता निर्माण झाली होती. त्या काळात प्रशासनाने योग्य नियोजन करत पुरवठा सुरळीत ठेवण्यात यश मिळवले होते. वाहनांना गॅस मिळेल की नाही, अशी भीती असतानाही परिस्थिती नियंत्रणात राहिली होती. मात्र आता पर्यटन हंगाम ऐन भरात असताना जिल्ह्यात सीएनजीचा तुटवडा जाणवू लागल्याने वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
रत्नागिरी शहरासह समुद्रकिनारी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या तालुक्यांमध्येही हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या मार्गांवरील सीएनजी पंपांबाहेर रिक्षा, खासगी वाहने आणि पर्यटकांच्या गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. या प्रतीक्षेमुळे पर्यटकांचा मौल्यवान वेळ खर्ची पडत असून, वाहतूक व्यवस्थेवरही ताण वाढत आहे.
दरम्यान, सीएनजीसाठी तासन्तास प्रतीक्षा करावी लागत असल्याने रिक्षा व्यावसायिकांच्या दैनंदिन उत्पन्नावर परिणाम होत असल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे. पर्यटन हंगामात वाढणारी मागणी लक्षात घेऊन इंधन वितरण कंपन्या आणि प्रशासनाने समन्वय साधून अतिरिक्त पुरवठ्याचे नियोजन करावे, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.

