(तरवळ / अमित जाधव)
छत्रपती संभाजीनगर येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत मालगुंड येथील बळीराम परकर विद्यालय आणि मुरारी तथा भाई मयेकर ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी संगम सुयोग चव्हाण याने सुवर्ण पदक पटकावत इतिहास रचला. या उल्लेखनीय कामगिरीनंतर त्याचे आज (१६ ऑक्टोबर) रोजी मालगुंडमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. गावकऱ्यांनी, विद्यार्थ्यांनी आणि मान्यवरांनी सहभागी झालेल्या या भव्य विजयी मिरवणुकीने मालगुंड, गणपतीपुळे आणि परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले.
संगम चव्हाण आणि त्याचे प्रशिक्षक रूपेश तावडे यांच्या स्वागतासाठी ढोल-ताशा, लेझीम आणि झांज पथकासह रंगतदार मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. मालगुंड जीवन शिक्षण प्राथमिक शाळेपासून ते मालगुंड प्रशालेपर्यंत निघालेल्या या मिरवणुकीत फुलांचा वर्षाव, जयघोष आणि टाळ्यांचा कडकडाट होत होता. विद्यार्थ्यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभे राहून आपल्या सहाध्यायावर फुलांचा वर्षाव करत ‘संगम चव्हाण अभिमान आमचा!’ अशा घोषणा दिल्या.
राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व
१४ वर्षांखालील गटातील राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्यामुळे संगम चव्हाणची २७ व २८ ऑक्टोबर रोजी नागालँडच्या कोहिमा येथे होणाऱ्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. ही कामगिरी मालगुंड एज्युकेशन सोसायटीसाठी तसेच संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यासाठी ऐतिहासिक आणि अभिमानास्पद ठरली आहे.
गुरू-शिष्याच्या मेहनतीला दाद
संगमच्या यशामागे प्रशिक्षक रूपेश तावडे यांचे कुशल मार्गदर्शन, तसेच संगमचे पालक सुयोग आणि त्यांच्या पत्नीचे सातत्यपूर्ण प्रयत्न महत्त्वाचे ठरले आहेत. मोठी मेहनत आणि शिस्तीमुळे संगमने हे यश संपादन केले, असे मान्यवरांनी नमूद केले.
मान्यवरांची उपस्थिती आणि शुभेच्छा वर्षाव
या विजयी मिरवणुकीसाठी मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनिल (बंधू) मयेकर, उपाध्यक्ष विवेक परकर, सचिव विनायक राऊत, खजिनदार संदीप कदम, संचालक रोहित मयेकर, किशोर पाटील, मुख्याध्यापक बिपीन परकर, पर्यवेक्षक उमेश केळकर, शिक्षिका दीप्ती मयेकर, पोलिस पाटील अमोल राऊत, तसेच अनेक ग्रामस्थ आणि नागरिक उपस्थित होते.
सर्व मान्यवरांनी संगम चव्हाण आणि प्रशिक्षक रूपेश तावडे यांचा सत्कार करून त्यांना राष्ट्रीय स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

