(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरातील राजीवडा परिसरातून १७ वर्षीय अल्पवयीन मुलाच्या अपहरणाची घटना मंगळवारी दुपारी १.४५ च्या सुमारास घडली. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अमजद अलीमियाँ सोलकर (रा. राजीवडा, व्यवसाय- मासेमारी) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांचा भाचा कोणालाही काहीही न सांगता अचानक घरातून निघून गेला. त्यानंतर त्यांनी शहरातील विविध भागांमध्ये, रेल्वे स्थानक, बसस्थानक, तसेच नातेवाईक व मित्रांकडे शोध घेतला, मात्र तो कुठेही सापडला नाही.
दरम्यान, नाझिया नावाच्या एका ओळखीच्या महिलेला या अल्पवयीन मुलाने स्वतःच्या मोबाईलवरून फोन करून ‘बाणकोट येथे जात आहे’ असे सांगितल्याची माहिती समोर आली आहे. मात्र तो अद्याप तिच्याकडेही पोहोचलेला नाही.
या पार्श्वभूमीवर, अल्पवयीन मुलाला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले असावे, असा संशय सोलकर यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय दंड विधान कलम ३६३ अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.