(संगमेश्वर / प्रतिनिधी)
देवरूख नगरपंचायतीतील कंत्राटी कामगार भरती प्रक्रिया प्रशासनाच्या कार्यपद्धतीमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. स्थानिक बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी देण्याऐवजी परगावातील आणि परजिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप काही नगरसेवकांनी केला आहे. भरती प्रक्रियेतील कथित अनियमितता आणि अपारदर्शकतेविरोधात नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने अंतिम टप्प्यात पोहोचलेली ही प्रक्रिया तूर्तास स्थगित करण्यात आली आहे.
देवरूख नगरपंचायतीमार्फत विविध कामांसाठी कंत्राटी कामगारांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत होती. या भरतीमुळे शहरातील बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, स्थानिक उमेदवारांना प्रक्रियेची पुरेशी माहिती न देता प्रशासनातील काहींच्या मर्जीतील तसेच परजिल्ह्यातील व्यक्तींना कामावर घेण्यासाठी हालचाली सुरू असल्याची चर्चा शहरात सुरू झाली. त्यामुळे भरती प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले. या कथित प्रकाराची दखल घेत काही नगरसेवकांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर आक्षेप नोंदवला. स्थानिक तरुणांना डावलून बाहेरील उमेदवारांची निवड केली जात असल्यास ती अन्यायकारक ठरेल, अशी भूमिका त्यांनी मांडली. स्थानिकांच्या रोजगाराच्या संधीवर गदा आणणारी प्रक्रिया तातडीने थांबवून भरतीचे निकष आणि निवडपद्धती स्पष्ट करावी, अशी मागणीही करण्यात आली.
नगरसेवकांच्या विरोधामुळे आणि वाढत्या दबावामुळे अखेर नगरपंचायत प्रशासनाला भरती प्रक्रिया स्थगित करावी लागली. मात्र, ही स्थगिती तात्पुरती ठरणार की भरती प्रक्रियेचा नव्याने आढावा घेऊन स्थानिक उमेदवारांना न्याय दिला जाणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. त्यामुळे भरतीचे निकष, उमेदवार निवडीची पद्धत आणि प्रशासनाची अधिकृत भूमिका याबाबत नगरपंचायतीने स्पष्टीकरण देण्याची गरज निर्माण झाली आहे.


