( रत्नागिरी / वार्ताहर )
टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर, कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘कचऱ्यातून कलाकृती’ आंतरशालेय स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत केळ्ये मराठी शाळेने प्रथम क्रमांक पटकावला. पटवर्धन हायस्कूलने द्वितीय, नाईक हायस्कूलने तृतीय, तर पोदार स्कूलने उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले.
वाढते प्रदूषण आणि कचऱ्याची समस्या लक्षात घेता, टाकाऊ वस्तूंपासूनही उपयुक्त व आकर्षक कलाकृती तयार करता येतात, ही संकल्पना विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याच्या उद्देशाने पटवर्धन हायस्कूलमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत प्रत्येक शाळेतील तीन विद्यार्थ्यांच्या गटाला दिलेल्या दोन तासांच्या कालावधीत कलाकृती तयार करायची होती. विविध शाळांमधील एकूण ६० विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंचा कल्पकतेने वापर करून आपल्या सर्जनशीलतेचे दर्शन घडविले.
स्पर्धेत केळ्ये मराठी शाळेच्या संघाने कचऱ्यापासून रोबोट तयार करून प्रथम क्रमांक मिळविला. पटवर्धन हायस्कूलच्या संघाने ‘फुलपाखरू गार्डन’ ही कलाकृती साकारत द्वितीय क्रमांक पटकावला. नाईक हायस्कूलच्या संघाने तयार केलेल्या वॉलपीसला तृतीय क्रमांक मिळाला. पोदार स्कूलच्या संघाने सादर केलेल्या शोपीसला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
या स्पर्धेचे इव्हेंट चेअर रोटे. निहार वैद्य यांनी नियोजन केले. डॉ. आनंद आंबेकर आणि आर्या वंडकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. कलाकृतींचे परीक्षण करताना विद्यार्थ्यांची कल्पकता, टाकाऊ वस्तूंचा वापर आणि कलात्मक दृष्टिकोन या बाबी विचारात घेण्यात आल्या.
रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीतर्फे सामाजिक बांधिलकी जपत पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये कचरा व्यवस्थापन आणि पुनर्वापराबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देतानाच त्यांच्यात पर्यावरणाप्रती जबाबदारीची भावना रुजविणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता.
स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्याला रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीचे अध्यक्ष अॅड. मनीष नलावडे, सचिव आनंद चौगुले, कॅप्टन दिलीप भाटकर, विनायक हातखंबकर सर, धरमसीभाई चौहान, अंजली इंदुलकर, निलेश मुळ्ये, विजय पवार, रोटरी सदस्य व माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, अशोक घाटे, माधुरी कळंबटे, पटवर्धन हायस्कूलचे प्राचार्य आणि शिक्षकवर्ग उपस्थित होते.


