(संगमेश्वर / मकरंद सुर्वे)
चिपळूण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या असंख्य कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. चिपळूण शहरातील हॉटेल साईशा येथे नुकताच हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
चिपळूण तालुक्यातील दळवटणे, वालोपे, निरबाडे आणि वालोटी या भागांतील राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या कार्यकर्त्यांनी यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना कीर्तनकार ह.भ.प. श्री. तांबिटकर महाराज, प्राध्यापक टेरवकर आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी संबोधित केले.
यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. ज्येष्ठ निवेदक शहीदभाई खेरटकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि आभार मानले. राष्ट्रगीताने या सोहळ्याची सांगता झाली.
या कार्यक्रमाला माथाडी कामगार सेनेचे सरचिटणीस रविकांत काणेकर, शेतकरी सेनेचे जिल्हा सचिव जितेंद्र महाडिक, गुहागर तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर, वाहतूक सेनेचे तालुकाध्यक्ष मिलिंद कदम, माजी तालुका प्रवक्ते संदेश साळवी आणि महिला उपाध्यक्षा स्मिता पावसकर यांच्यासह मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो : पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांसमवेत मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण आणि पदाधिकारी.


