(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी येथे शासकीय पॉलिटेक्निक महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या सातारा जिल्ह्यातील १७ वर्षीय विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (२६ ऑक्टोबर) घडली. रणवीर सुरेंद्र कल्याणकर असे या विद्यार्थ्याचे नाव असून, त्याच्या आकस्मिक मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
रणवीर हा सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील विंग येथील रहिवासी होता. शिक्षणासाठी तो रत्नागिरीत आला होता. शहरातील अभ्युदयनगर परिसरात घरमालक सोनाली संदेश सावंत यांच्याकडे तो पेइंग गेस्ट म्हणून वास्तव्यास होता. त्याच्यासोबत अन्य दोन विद्यार्थीही राहत होते. सोमवारी सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास रणवीरला चक्कर आल्याने त्याला रत्नागिरीतील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती घरमालक सावंत यांनी त्याच्या वडिलांना दूरध्वनीद्वारे दिली.
त्यानंतर वडील सुरेंद्र वसंत कल्याणकर हे खासगी वाहनाने रुग्णालयात पोहोचले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. नूतन सातगडे यांनी उपचार सुरू असताना सकाळी ११.०२ वाजता रणवीरला मृत घोषित केले. या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक १३९/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम १९४ प्रमाणे करण्यात आली आहे. विद्यार्थ्याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.


