(साखरपा / भरत माने)
सध्या संपूर्ण कोकणात शिमगा उत्सवाची धामधूम सुरू असून ग्रामदेवतांच्या पालख्या भक्तांच्या भेटीसाठी घरोघरी फिरू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर तिवरे–मेढे येथील श्री देव विरोबा आणि आई देवी ढोलकरीण यांच्या शिमगोत्सवानिमित्त तिवरे–मेढे ग्राम विकास मंडळ (मुंबई व ग्रामीण) यांच्या वतीने विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही शिमगा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या उत्सवादरम्यान उद्या शनिवार, ७ मार्च रोजी रात्री १० वाजता सहाणेवरील पारंपरिक गाण्यांचा भक्तीमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात शक्तीतुरा फेम गायक व शाहीर विकास लांबोरे आपल्या दमदार सादरीकरणातून शिमगा गीतांचा नजराणा रसिकांसमोर सादर करणार आहेत. हा कार्यक्रम राजुदादा खेडेकर यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आला आहे.
तसेच सोमवार, ९ मार्च रोजी निमंत्रित पथकांच्या सहभागातून आकर्षक पालखी नृत्य सोहळा पार पडणार आहे. विविध पथकांकडून सादर होणाऱ्या पारंपरिक पालखी नृत्याचे दर्शन ग्रामस्थांना घडणार असून हा सोहळा शिमगोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
याच कार्यक्रमानंतर विशेष सन्मान समारंभाचेही आयोजन करण्यात आले आहे. या सर्व उपक्रमांमुळे तिवरे–मेढे परिसरात शिमगा उत्सवाचे वातावरण अधिक रंगतदार झाले आहे. या भरगच्च कार्यक्रमांना ग्रामस्थांनी आणि भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन तिवरे–मेढे ग्राम विकास मंडळ (मुंबई व ग्रामीण) यांच्या वतीने करण्यात आले आहे.

