(चिपळूण / वार्ताहर)
तब्बल नऊ वर्षांपूर्वी, २०१७-१८ मध्ये सुरू करण्यात आलेल्या चिपळूणच्या बहुचर्चित हायटेक बसस्थानकाचे काम अद्याप केवळ ५० टक्क्यांपर्यंतच पूर्ण झाले आहे. कासवगतीने सुरू असलेल्या या कामामुळे यंदाच्या गणेशोत्सवासाठी स्थानिकांसह चिपळूणमध्ये दाखल होणाऱ्या चाकरमान्यांच्या सुविधांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
पावसाळ्यात स्थानकाचे काम अपूर्ण असल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. बसची प्रतीक्षा करण्यासाठी पुरेशी जागा, पावसापासून संरक्षण आणि अन्य मूलभूत सुविधांचा अभाव जाणवत आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची गैरसोय आणखी वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सुमारे दोन महिन्यांपूर्वी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चिपळूण बसस्थानकाची पाहणी करून रखडलेल्या कामाला गती देण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यांच्या पाहणीनंतर कामाला वेग मिळेल आणि गणेशोत्सवापूर्वी प्रवाशांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. मात्र, सद्यस्थितीत कामाची गती पाहता या सूचनांची अंमलबजावणी कितपत झाली, असा सवाल उपस्थित होत आहे.
हायटेक बसस्थानकाच्या पहिल्या मजल्यावरील कार्यालयाची उभारणी यासह काही महत्त्वाची कामे अद्याप बाकी आहेत. उर्वरित कामासाठी निविदा प्रक्रिया कधी पूर्ण होणार, प्रत्यक्ष कामाला कधी सुरुवात होणार आणि संपूर्ण बसस्थानक प्रवाशांच्या सेवेत कधी दाखल होणार, याकडे चिपळूणकरांचे लक्ष लागले आहे.
गणेशोत्सवाच्या काळात चिपळूणमध्ये मोठ्या संख्येने चाकरमानी दाखल होतात. या पार्श्वभूमीवर प्रवाशांना पावसापासून संरक्षण, बसची प्रतीक्षा करण्यासाठी सुरक्षित व पुरेशी जागा तसेच आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून बसस्थानकाच्या अपूर्ण कामाचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. यंदाही त्याच परिस्थितीची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे.
गणेशोत्सवापूर्वी उर्वरित कामाला गती देऊन प्रवाशांसाठी आवश्यक त्या सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, तसेच संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ठोस कालबद्ध नियोजन जाहीर करावे, अशी मागणी प्रवासी आणि चाकरमान्यांकडून होत आहे.

