( सावर्डे / चिपळूण )
चिपळूण तालुक्यातील कोकण रेल्वेच्या महत्त्वाच्या सावर्डे रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या दीर्घकालीन मागणीला अखेर यश आले आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसह सोयीसाठी फलाट क्रमांक १ ते २ दरम्यान प्रवासी पादचारी उड्डाणपूल (फूट ओव्हर ब्रिज) उभारण्यास रेल्वे प्रशासनाने मंजुरी दिली आहे. सुमारे १ कोटी ६० लाख रुपये खर्चाच्या या कामामुळे परिसरातील सुमारे ६० गावांतील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सावर्डे स्थानकावर फलाट क्रमांक १ वर आवश्यक सुविधा उपलब्ध असल्या, तरी फलाट क्रमांक २ वर अद्याप प्लॅटफॉर्मच नसल्याने प्रवाशांना थेट जमिनीवर, चिखल आणि गवतामध्ये उतरावे लागत होते. तसेच एका फलाटावर रेल्वे उभी असल्यास दुसऱ्या फलाटावर जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होत होता.
या गंभीर समस्येची दखल घेत कोकण रेल्वे सावर्डे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सचिन कोल्हापुरे आणि संघटनेच्या सदस्यांनी सातत्याने रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला. याशिवाय आमदार शेखर निकम यांनीही रेल्वे प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी विशेष प्रयत्न केले. अखेर रेल्वे प्रशासनाने फलाट क्रमांक १ ते २ दरम्यान प्रवासी पादचारी उड्डाणपूल उभारण्यास मंजुरी दिली असून, त्याबाबतचे अधिकृत पत्र अध्यक्ष सचिन कोल्हापुरे यांना प्राप्त झाले आहे.
मात्र, स्थानकावरील इतर मूलभूत सुविधांचा प्रश्न अद्याप कायम आहे. फलाट क्रमांक १ वरील शेड अपुरी असल्याने पावसाळ्यात प्रवाशांना उघड्यावर थांबावे लागते. तर फलाट क्रमांक २ वर प्लॅटफॉर्म, प्रवासी निवारा आणि इतर आवश्यक सुविधा नसल्याने परिसरातील सुमारे ६० गावांतील प्रवाशांना अनेक वर्षांपासून गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
उड्डाणपुलाच्या मंजुरीनंतर आता स्थानकावरील उर्वरित सुविधाही तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी कोकण रेल्वे सावर्डे प्रवासी संघटनेने रेल्वे प्रशासनाकडे केली असून, या मागण्याही लवकर पूर्ण होतील, अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.

