(नवी दिल्ली / वृत्तसंस्था)
टोल नाक्याजवळ राहणाऱ्या आणि नियमित प्रवास करणाऱ्या खासगी वाहनधारकांसाठी FASTag वार्षिक पासची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने या सवलतीच्या पाससंदर्भातील नियमांमध्ये बदल केले असून, टोल प्लाझाच्या स्थानानुसार वार्षिक पाससाठी १,५०० रुपये किंवा ३,००० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी संबंधित वाहन खासगी वापरासाठी नोंदणीकृत असणे आणि त्यावर FASTag असणे आवश्यक आहे.
नव्या व्यवस्थेनुसार, टोल नाका नगरपालिका किंवा स्थानिक नागरी क्षेत्राच्या हद्दीबाहेर असल्यास वार्षिक पाससाठी १,५०० रुपये शुल्क आकारले जाईल. मात्र, टोल प्लाझा नगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हद्दीत असल्यास वर्षभराच्या पाससाठी ३,००० रुपये भरावे लागतील. यापूर्वी मासिक पाससाठी वर्षभरात सुमारे ४,३२० रुपयांपर्यंत खर्च होत होता. त्यामुळे पात्र वाहनधारकांना नव्या वार्षिक पासमुळे टोल खर्चात बचत करण्याची संधी मिळू शकते.
या अंतर्गत टोल प्लाझाच्या 20 किलोमीटरच्या परिघात राहणारे काही खाजगी वाहन मालक वार्षिक लोकल पास बनवू शकतील. हा नियम 1 नोव्हेंबर, 2026 पासून लागू होईल.
तथापि, प्रत्येक स्थानिक रहिवासी या सुविधेचा लाभ घेऊ शकणार नाही. जर येण्या-जाण्यासाठी सर्व्हिस रोड किंवा पर्यायी रस्ता उपलब्ध असेल, तर सवलतीचा पास जारी केला जाणार नाही.
या पासच्या वापरावर काही मर्यादाही आहेत. वार्षिक पास ज्या विशिष्ट टोल नाक्यासाठी जारी केला जाईल, त्याच टोल प्लाझावर त्याचा वापर करता येईल. प्रवासादरम्यान अन्य टोल नाके लागल्यास तेथे स्वतंत्रपणे शुल्क भरावे लागू शकते. तसेच, राष्ट्रीय महामार्ग किंवा द्रुतगती मार्गांवरील टोल वसुली प्रणाली असलेल्या ठिकाणी ही सवलत लागू होणार नाही.
वार्षिक पासच्या शुल्काचा आढावा दरवर्षी १ एप्रिल रोजी घेतला जाणार असल्याचे मंत्रालयाच्या नियमांमध्ये नमूद आहे. त्यामुळे आगामी वर्षांत पासच्या शुल्कात बदल होण्याची शक्यता आहे. या सुविधेचा लाभ घेण्यापूर्वी वाहनधारकांनी संबंधित टोल नाक्यासाठी लागू असलेल्या अटी तपासणे आवश्यक आहे.


