(गणपतीपुळे / वैभव पवार)
बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा रत्नागिरी आणि संस्कार समिती रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षावास कालखंडात आयोजित करण्यात आलेल्या धम्मप्रवचन मालिकेचा सांगता समारंभ आश्विन पौर्णिमेच्या पवित्र दिनी फणसोप भीमनगर येथील शांतीदूत बुद्धविहारात उत्साहपूर्ण आणि धम्ममय वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमात मुंबई येथील बौद्ध धम्मगुरू भंते मिलिंद बोधी यांनी विशेष धम्मदेसना देताना उपस्थित धम्मबांधवांना धम्माचे आचरणशील पाईक बनण्याचे आवाहन केले.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भगवान बुद्धांचा कल्याणकारी आणि विज्ञाननिष्ठ धम्म समाजाला देऊन सर्वांना सन्मार्गावर आणले. तसेच बावीस प्रतिज्ञांच्या माध्यमातून कर्मकांड आणि अंधश्रद्धेपासून मुक्त होण्याचा मार्ग दाखविला. त्यामुळे या सत्धम्माचे पाईक बनून त्याचे काटेकोरपणे पालन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यासाठी केवळ धम्माची माहिती घेणे पुरेसे नसून, प्रत्यक्ष जीवनात धम्माचे आचरण करणे आवश्यक आहे, असे भंते मिलिंद बोधी यांनी सांगितले.
आज बौद्ध धर्मगुरूंची संख्या कमी असल्याने धम्मप्रचाराचे कार्य अपेक्षित प्रमाणात होत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. धम्मप्रचाराचे चक्र गतिमान करण्यासाठी सेवानिवृत्त व्यक्तींनी तसेच धम्ममार्गावर चालणाऱ्या लोकांनी एकत्र येऊन पुढाकार घेण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. वर्षावास कालखंडातील प्रवचन मालिकेतून झालेल्या प्रबोधनाचे प्रतिबिंब समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या विचारांत आणि आचरणात उमटले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. मानवी जीवनातील विविध उदाहरणे आणि गोष्टींच्या माध्यमातून त्यांनी धम्माचे महत्त्व उपस्थितांसमोर सहज, प्रभावी आणि ओघवत्या वाणीतून मांडले.
बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक २४, फणसोप भीमनगर, बाळ राहुल मंडळ आणि आम्रपाली उपासिका यांच्या वतीने या सांगता समारंभाचे दिमाखदार आणि नियोजनबद्ध आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी फणसोप भीमनगर येथील मुख्य बसथांब्यापासून शांतीदूत बुद्धविहारापर्यंत भंते मिलिंद बोधी यांचे पुष्पवृष्टी करून शांततापूर्ण वातावरणात सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले. त्यानंतर बुद्धविहारासमोरील पटांगणात भंते मिलिंद बोधी यांच्या हस्ते पंचशील धम्मध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी बौद्धाचार्य वैभव पवार यांनी धम्मध्वज गाथेचे पठण केले.
फणसोप भीमनगर गावशाखेच्या वतीने संपूर्ण शांतीदूत बुद्धविहार परिसरात पंचशील धम्मध्वज लावून धम्ममय वातावरण निर्माण करण्यात आले होते. तसेच पूजा स्थानाची आकर्षक सजावट करून परिसर प्रसन्न करण्यात आला होता. त्यानंतर बुद्धविहारातील आदर्शांसमोर बौद्धजन पंचायत समितीच्या तालुका शाखा रत्नागिरी आणि फणसोप गावशाखेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते दीप व गंध प्रज्वलन करण्यात आले.
फणसोप गावशाखेचे अध्यक्ष मिलिंद कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ पार पडला. यावेळी व्यासपीठावर तालुका शाखेचे अध्यक्ष प्रकाश पवार, चिटणीस सुहास कांबळे, तालुका विवाह मंडळाचे अध्यक्ष विद्याधर कांबळे आणि सेवानिवृत्त तहसीलदार विजय जाधव उपस्थित होते. तालुका शाखेच्या महिला मंडळाच्या अध्यक्षा ऋतुजा आंबुलकर, उपाध्यक्षा रितिका जाधव, कोषाध्यक्षा प्रज्ञा पवार, चिटणीस दिया कांबळे यांच्यासह तालुका शाखेच्या अंतर्गत असलेल्या सर्व उपसमित्यांचे प्रमुख पदाधिकारी, सदस्य, श्रामणेर, बौद्धाचार्य, गाववार प्रतिनिधी आणि धम्मबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भंते मिलिंद बोधी यांनी उपस्थितांना त्रिसरण आणि पंचशील देऊन बुद्धवंदना घेतली. त्यानंतर फणसोप गावशाखेच्या वतीने प्रमुख मान्यवर आणि धम्मबांधवांचे सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले. वर्षावास कालखंडात आयोजित धम्मप्रवचन मालिकेत प्रवचनकार म्हणून प्रबोधन करणारे बौद्धाचार्य विजय जाधव, ऋतुजा आंबुलकर, संतोष कदम, प्रशांत जाधव आणि वैभव पवार यांचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना तालुका शाखेचे अध्यक्ष प्रकाश पवार यांनी वर्षावास कालखंडातील धम्मप्रवचन मालिकेचे नियोजनबद्ध आयोजन केल्याबद्दल संबंधित गावशाखेचे अभिनंदन केले. तसेच दरवर्षी वर्षावासाच्या काळात जनजागृतीसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या धम्मप्रबोधन कार्यक्रमांत धम्मबांधवांनी धम्मनिष्ठेने सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
फणसोप गावशाखेचे अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी वर्षावास सांगता समारंभ आयोजित करण्याची संधी दिल्याबद्दल तालुका शाखेचे आभार मानले. तसेच भंते मिलिंद बोधी यांनी प्रभावी धम्मदेसनेतून केलेल्या प्रबोधनाबद्दल त्यांचेही आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फणसोप गावशाखेचे खजिनदार सागर कांबळे आणि रत्नागिरी संस्कार समितीचे चिटणीस रविकांत पवार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक २४, फणसोप भीमनगरचे अध्यक्ष मिलिंद कांबळे, उपाध्यक्ष विलास कांबळे, चिटणीस अरविंद सावंत, सहचिटणीस नितेश कांबळे, खजिनदार सागर कांबळे, हिशोब तपासणीस विकास कांबळे, सल्लागार रवींद्र कांबळे व राजेंद्र जाधव, संदेशवाहक उत्तम कांबळे यांनी मेहनत घेतली.
तसेच रमाई महिला मंडळाच्या अध्यक्षा तृप्ती कांबळे, उपाध्यक्ष मृणाली सावंत, चिटणीस सानवी कांबळे, सहचिटणीस मेघना कांबळे, खजिनदार वृषाली कांबळे, बाळ राहुल मंडळ आणि आम्रपाली उपासिका यांनीही कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विशेष परिश्रम घेतले.


