(संगमेश्वर /प्रतिनिधी)
मुंबई गोवा महामार्गाचे काम गेली अनेक वर्षे सुरू असून तुरळ फाटा येथे काँक्रीटीकरण करण्यात आले तेव्हा कडवईला जोडणारा रस्ता व महामार्ग यात मोठा खड्डा तयार निर्माण झाला. याठिकाणी दगड माती टाकून भराव करण्यात आला होता. परंतु हे काम काळजीपूर्वक न केल्याने वाहन चालकांना गावातून हायवेवर येताना त्रास सहन करावा लागत होता. काही वेळा अपघाताची स्थिती निर्माण होत होती. भराव केल्यानंतर त्यावर रोज पाणी न मारल्याने स्थानिक व्यापारी व नागरिकांना धुळीचा प्रचंड त्रास होत होता. या त्रासाला कंटाळून तुरळ फाटा व्यापारी संघटनेने या संदर्भात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
नागरिकांची व व्यापाऱ्यांची होणारी गैरसोय चिपळूण संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी त्वरित या कामात लक्ष घातले. त्यामुळे महामार्ग प्रशासनाने लगेचच कामाला सुरुवात केली. या कामाचे काँक्रीटीकरण सुरू करण्यात आले. आमदारांनी या कामात लक्ष दिल्यानेच हे काम जलद गतीने सुरू झाले. याबद्दल व्यापारी वर्ग व वाहन चालक यामध्ये समाधान व्यक्त केले आहे.
काँक्रीटीकरण झाल्याने कडवईची वाहतूक चिखली व धामणाकवाडी मार्गे सुरू आहे. तरी वाहन चालकांनी आठ दिवस सहकार्य करण्याची अपेक्षा ग्रामपंचायत कडवईच्या वतीने करण्यात येत आहे.