( विल्ये / अमित कांबळे)
अशोका विजया दशमीनिमित्त २० ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे ५.४५ वाजता रत्नागिरीतील खेडशी येथील गयाळवाडी विपश्यना ध्यानधारणा केंद्रात सुशील जाधव निर्मित “मङ्गल धम्म पभात“ बुद्ध धम्म स्वराधना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बुद्ध धम्माच्या वैचारिकतेवर प्रकाश टाकणारी गीते या कार्यक्रमात सादर केली जाणार आहेत.
समाजातील मान्यवर कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी विचारमंच उपलब्ध करून देणे आणि त्याद्वारे धम्मसेवा करणे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी पूर्णपणे विनामूल्य असून उपस्थित रसिकांसाठी अल्पोपहाराची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
धम्म चळवळीवर आधारित या शास्त्रीय गीतगायन कार्यक्रमाचे संगीत संयोजन आयु. दिलीप मोहिते करणार आहेत. ते शास्त्रीय गायनाचे सखोल अभ्यासक असून वादन क्षेत्रातील दिग्गज कलाकार आहेत. वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेत असलेल्या सिद्धी कासारे यांचाही या कार्यक्रमात स्वरांचा सहभाग असेल.
कार्यक्रमाचे निवेदन रत्नागिरीतील सुप्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक सुशील जाधव करणार आहेत. प्रिया सुरेश, दिलीप मोहिते, अमरदीप कदम आणि सिद्धी कासारे हे गायक म्हणून सहभागी होणार आहेत. तबल्यावर गौरव पाटकर, सिंथेसायझरवर ओंकार आंबेरकर, तर तालवाद्यावर पिंट्या कांबळे साथ देणार आहेत. या कलाकारांच्या शास्त्रीय गीतगायनातून बुद्ध धम्म चळवळीतील वैचारिक विचार मांडले जाणार आहेत.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून कवी, लेखक, नाट्यदिग्दर्शक, अभिनेते आणि निर्माते आयु. उदय जाधव उपस्थित राहणार आहेत. विविध कथासंग्रह आणि कवितासंग्रहांसाठी त्यांना विशेष पुरस्कार प्राप्त झाले आहेत. या कार्यक्रमात त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच रत्नागिरीतील गयाळवाडी येथील धम्मदीप मंडळाचे आयु. संतोषजी कासारे यांचे कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य लाभत आहे.
अशोका विजया दशमीनिमित्त बुद्ध धम्माच्या विचारांचा प्रसार करणाऱ्या या उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल निर्माते आणि आयोजकांचे समाजबांधवांकडून कौतुक होत आहे.


