(गुहागर/ रत्नागिरी)
पोटात गॅस झाल्याने अस्वस्थ झालेल्या अवघ्या साडेचार महिन्यांच्या चिमुकलीचा उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. निर्वी निलेश भुवड (वय ४ महिने १५ दिवस, रा. नांदगाव, ता. चिपळूण) असे मृत चिमुकलीचे नाव आहे. या घटनेची नोंद गुहागर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निर्वी हिच्या पोटात गॅस होत असल्याने १६ सप्टेंबर रोजी तिच्यावर चिपळूण येथील डॉ. मनियार यांच्याकडे उपचार करण्यात आले होते. त्यानंतर ती आई-वडिलांसोबत वडिलांच्या सासरी तळवली-आगरवाडी, ता. गुहागर येथे गेली होती. दरम्यान, रात्री साडेअकराच्या सुमारास निर्वी रडू लागल्याने तिच्या वडिलांनी पाहिले असता तिचे पोट फुगल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तिला स्थानिक डॉक्टर आशिष चौगुले यांच्याकडे दाखविण्यात आले. प्रकृती लक्षात घेता चिमुकलीला पुढील उपचारासाठी तातडीने रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.
त्यानुसार १७ सप्टेंबर रोजी पहाटे साडेबारा वाजता तळवली येथून निर्वीला घेऊन कुटुंबीय निघाले. पहाटे दीडच्या सुमारास तिला उपजिल्हा रुग्णालय, कामथे (ता. चिपळूण) येथे दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर निर्वी हिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये करण्यात आली आहे. निर्वीच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, गुहागर पोलिसांकडून आवश्यक कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे.


