(रत्नागिरी / वार्ताहर)
सायबर फसवणुकीत बँक खात्यातून गमावलेली ५ लाख ३८ हजार रुपयांची रक्कम अखेर परत मिळवण्यात एका नागरिकाला यश आले आहे. बँक ऑफ इंडियाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेली मदत आणि उद्योगमंत्री तथा पालकमंत्री प्रा. डॉ. उदय सामंत यांनी या प्रकरणात केलेल्या विशेष सहकार्यामुळे ही रक्कम संबंधित नागरिकाच्या खात्यात जमा झाली. सायबर फसवणुकीनंतर पैसे परत मिळवण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांना यश आल्याने या प्रकरणाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
या प्रकरणात २५ जुलै रोजी धीरज या नागरिकाच्या बँक खात्यातून अचानक २५ हजार रुपये, त्यानंतर २ लाख रुपये आणि पुन्हा २ लाख रुपये अशा व्यवहारांद्वारे एकूण सुमारे ५ लाख ८७ हजार रुपये परस्पर डेबिट झाले. खात्यातून मोठी रक्कम काढली गेल्याचे लक्षात आल्यानंतर धीरज याने मित्र राजेश सोहोनी यांच्याशी संपर्क साधून घडलेली घटना सांगितली.
प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन राजेश सोहोनी यांनी तातडीने बँक ऑफ इंडियाच्या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधला आणि संबंधित खाते फ्रीझ करण्याची विनंती केली. बँकेच्या ऑनलाइन सेवा विभागाने तत्काळ कार्यवाही करून खाते फ्रीझ केले. त्यानंतर राष्ट्रीय सायबर क्राईम हेल्पलाइन क्रमांक १९३० वर संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, या प्रक्रियेदरम्यान सर्वसामान्य नागरिकांना येणाऱ्या अडचणींचा अनुभव आला. अखेर सायबर क्राईमच्या वेबसाइटवर ऑनलाइन तक्रार नोंदवण्यात आली.
दरम्यान, राजेश सोहोनी यांचे बँक ऑफ इंडियाच्या जयगड शाखेत पूर्वीपासून खाते होते. त्या वेळी शाखा व्यवस्थापक असलेल्या कुमार यांच्याशी त्यांचे जुने संबंध असल्याने त्यांनी कुमार यांच्याशी संपर्क साधून मदतीची विनंती केली. त्यानुसार मुंबईत असलेले धीरज दुसऱ्याच दिवशी रत्नागिरीत दाखल झाले. बँकेत आल्यानंतर बँक ऑफ इंडियाच्या प्रियांका कुमारी यांनी आवश्यक कागदपत्रे वेळेत ऑनलाइन अपलोड करण्यासाठी तसेच सायबर इन्शुरन्सचा अर्ज दाखल करण्यासाठी महत्त्वाचे सहकार्य केले.
मात्र, सायबर क्राईम विभागाकडून अपेक्षित पाठपुरावा आणि प्रतिसाद मिळत नसल्याने या प्रकरणात अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे राजेश सोहोनी यांनी हा प्रश्न उद्योगमंत्री तथा पालकमंत्री प्रा. डॉ. उदय सामंत यांच्यासमोर मांडला. पालकमंत्र्यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेत जिल्हा प्रशासन, सर्व बँकांचे वरिष्ठ अधिकारी आणि जिल्हा पोलीस यंत्रणेच्या सायबर विभागाची संयुक्त बैठक बोलावली. या उच्चस्तरीय बैठकीनंतर प्रकरणाच्या तपासाला गती मिळाली.
सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बँक ऑफ इंडियाकडून धीरज यांच्या मोबाईलवर सायबर इन्शुरन्स मंजूर झाल्याचा आणि ५,३८,००० रुपये जमा झाल्याचा संदेश प्राप्त झाला. त्यामुळे फसवणुकीत गमावलेल्या रकमेपैकी ही रक्कम परत मिळवण्यात यश आले.
या संपूर्ण प्रक्रियेत बँक ऑफ इंडियाने उपलब्ध करून दिलेली सायबर इन्शुरन्सची सुविधा आणि बँकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून मिळालेले सहकार्य महत्त्वाचे ठरले. सायबर गुन्ह्यांना सामोरे जाणाऱ्या नागरिकांना अशा संरक्षणात्मक सुविधांची माहिती मिळावी आणि बँकिंग क्षेत्रासह नियामक यंत्रणांनी त्यांचा अधिकाधिक प्रसार करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या प्रकरणात मदत केल्याबद्दल पालकमंत्री उदय सामंत तसेच बँक ऑफ इंडियाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले जात आहेत.


