(खेड / वार्ताहर)
खेड एसटी स्थानकातील शौचालयांमध्ये पसरलेली अस्वच्छता आणि दुर्गंधीमुळे प्रवाशांना होणाऱ्या त्रासाच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी, खेडच्या वतीने ‘चिंपाट व टमरेल’ आंदोलन करण्यात आले. स्थानकातील स्वच्छतेचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी करत भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर यांनी संबंधित प्रशासनाला चार दिवसांचा अल्टिमेटम दिला. या मुदतीत आवश्यक उपाययोजना न झाल्यास पुढील आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.
खेड एसटी स्थानकात दररोज मोठ्या संख्येने प्रवाशांची ये-जा सुरू असते. मात्र, येथील शौचालयांमध्ये स्वच्छतेचा अभाव असून दुर्गंधीमुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचा आरोप भाजपाच्या वतीने करण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखणे आणि प्रवाशांना स्वच्छ व आरोग्यदायी सुविधा उपलब्ध करून देणे ही संबंधित प्रशासनाची जबाबदारी असल्याचे आंदोलनकर्त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
या आंदोलनादरम्यान ॲड. वैभव खेडेकर यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त केली. एसटी स्थानकातील शौचालयांची तातडीने स्वच्छता करावी, दुर्गंधीची समस्या दूर करावी आणि प्रवाशांना स्वच्छतेच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली. या प्रश्नावर त्वरित कार्यवाही करण्यासाठी प्रशासनाला चार दिवसांची मुदत देण्यात आली आहे. दिलेल्या मुदतीत स्वच्छतेचा प्रश्न न सुटल्यास पुढील आंदोलनाची भूमिका घेतली जाईल, असा इशारा भाजपाच्या वतीने देण्यात आला.
या आंदोलनात भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे, भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजपा ट्रान्सपोर्ट सेल खेड तालुकाध्यक्ष सुयश खेडेकर, भाजपा रिक्षा युनिट उपतालुकाध्यक्ष संदीप शेंडगे, भाजपा प्रेणित रिक्षा सेल खेड तालुकाध्यक्ष राजन खेडेकर, भाजपा रिक्षा युनिट खेड उपतालुकाध्यक्ष तुषार पवार, भाजपा युवा मोर्चा खेड तालुकाध्यक्ष विशाल होळकर, भाजपा महिला मोर्चा खेड तालुकाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्षा उर्मिला शेट्ये-पाटणे, माजी नगरसेविका तथा भाजपा महिला मोर्चा खेड शहराध्यक्षा आशा सनगरे, भाजपा महिला मोर्चा खेड शहर उपाध्यक्ष प्रीती चिखले, भाजपा महिला मोर्चा खेड शहर चिटणीस आर्या कारेकर, भाजपा खेड शहर शक्तीकेंद्र प्रमुख वैजेश सागवेकर, भाजपा खेड शहर सरचिटणीस विजय गुप्ता, भाजपा खेड शहर चिटणीस अमित खेडेकर, भाजपा खेड शहर चिटणीस अनिकेत पवार, नंदू शिर्के, भाजपा तळे-सोंडे विभाग बूथ अध्यक्ष दत्तात्रय मोरे, भाजपा सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, ओवैस चौगुले, अक्षय सनगरे, बाळु वर्मा आणि प्रदीप भोसले यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


